होमपेज › Ahamadnagar › आश्‍विनी हर्बलकडून 98 लाखांची फसवणूक

आश्‍विनी हर्बलकडून 98 लाखांची फसवणूक

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 06 2018 1:02AMनगर : प्रतिनिधी

निमगाव वाघा येथील मे आश्‍विनी हर्बल या फर्मच्या प्रसाद बाळासाहेब गुंड याने यंत्रसामुग्री खरेदीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या चितळे रोड शाखेकडून सन 2015 मध्ये 98 लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु, त्याने यंत्रसामुग्री खरेदी न करता अपहार केला. याप्रकरणी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी अरविंद पांडुरंग शेणॉय यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून काल (दि. 5) प्रसाद गुंड व यंत्रसामुग्री विक्रेता अमोल गाडेकर या दोघांविरुद्ध संगनमताने फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आश्‍विनी हर्बल फर्मचे प्रसाद गुंड यांनी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडे 98 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. फर्मच्या कागदपत्रांची खात्री करून चितळे रोड शाखेचे तत्कालिन शाखाधिकारी नितीन सातपुते यांनी सदर फर्मला 3 फेब्रुवारी 2015 रोजी भेट दिली. त्यानंतर शिफारसीसह हे प्रकरण क्षेत्रीय कार्यालयाला पाठविले. क्षेत्रीय कार्यालयाने 6 फेब्रुवारी 2015 रोजी 98 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.

कर्ज मंजूर झाल्यानंतर शाखाधिकार्‍यांनी बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व दस्तऐवज घेतले व अटी-शर्तीच्या अधीन राहून कर्जदाराच्या मागणीप्रमाणे कर्जाची रक्कम चितळे रस्ता शाखेकडून यंत्रसामुग्री विक्रेता मे. श्री. साईराज एन्टरप्रायसेस मॅनेजिंग डायरेक्टर अमोल गाडेकर यांच्या नावे 16 फेब्रुवारी 2015 रोजी 98 लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे दिले. त्यानंतर तत्कालिन शाखाधिकारी सातपुते यांनी कर्जदाराच्या निमगाव वाघा येथील गट नंबर 272 मधील साईटला 13 जुलै 2015 रोजी भेट दिली. कर्जदाराने बांधकाम केलेले नव्हते व मशिनरी आढळलेली नव्हती. तसा अहवाल शाखाधिकारी सातपुते यांनी दिला होता. 
सदर कर्ज थकीत झाल्याने तत्कालिन शाखाधिकार्‍यांनी वेळोवेळी तपासणी केली, त्यावेळी यंत्रसामुग्री खरेदी केलेली आढळून आली नाही. त्यामुळे बँकेचे क्षेत्रीय अधिकारी शेणॉय यांच्या फिर्यादीवरून आश्‍विनी हर्बल फर्मचे प्रसाद गुंड व साईराज एन्टरप्रायसेसचे अमोल गाडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.