Tue, May 26, 2020 22:36होमपेज › Ahamadnagar › भरपावसात आशा कर्मचार्‍यांचा ‘रास्ता रोको’

भरपावसात आशा कर्मचार्‍यांचा ‘रास्ता रोको’

Published On: Sep 10 2019 1:18AM | Last Updated: Sep 10 2019 12:36AM
नगर : प्रतिनिधी
आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना तिप्पट मानधनवाढ देण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने माळीवाडा बसस्थानकाच्या जवळील इंपिरियल चौकात नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पाऊस सुरु असूनही आंदोलक महिलांनी आंदोलन सुरु ठेवले.

आंदोलनात आयटकचे जिल्हा सचिव सुधीर टोकेकर, सुवर्णा थोरात, कविता गिरे, सुरेश पानसरे, माधुरी भोसले, संध्या कोरडे, सविता ठोंबरे, लंका पठारे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रास्तारोको आंदोलनापूर्वी आशा कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेत थाळीनाद करून आक्रोश महाधरणे आंदोलन करून परिसर दणाणून सोडला होता.

थाळीनाद झाल्यानंतर आशा कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेतून बाहेर पडत नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको सुरु केला. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जेलभरो आंदोलन होणार आहे हे माहित असूनही अवघा एक पोलिस कर्मचारी उपस्थित होता. जवळपास एक तास आंदोलन सुरु होते. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना याबाबत माहिती समजल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांना फौजफाट्यासह  आंदोलनस्थळी पाठवले. त्यानंतर आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला काढत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आशा व गटप्रवर्तकांना तिप्पट मानधन द्यावे, दिवाळीला भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घ्यावा, आशांना आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर 10 हजार रुपये मानधन द्यावे तसेच गटप्रवर्तकांना 18 हजार मानधन लागू करावे, सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.