होमपेज › Ahamadnagar › ..तर सामूहिक आत्मदहन करणार!

..तर सामूहिक आत्मदहन करणार!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी       

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आज (दि.29)सकाळी 11 वाजेपर्यंत तोडगा न निघाल्यास, सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय राळेगणसिद्धीत काल झालेल्या महाग्रामसभेत घेण्यात आला. दरम्यान, ‘हमारी गाव, हमारी सरकार’ चा नारा देत सर्व शासकीय कर्मचार्‍यासह पोलिसांना गावातून बाहेर पाठवून देण्यात आले. 
सहा दिवसांनंतरही सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अन्नत्याग केलेल्या हजारे यांची प्रकृती खालावू लागली आहे. राळेगणसिद्धी परिवाराने हजारे यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करीत, तालुक्यातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत काल (दि.28) आयोजित केलेल्या महाग्रामसभेत आक्रमक भूमिका घेतली. सरकार अण्णांचा अंत पाहत असेल, तर आम्हीच आमचा अंत करतो, असे उपसरपंच लाभेश औटी यांनी यावेळी बोलताना सांगितले. माजी सरपंच जयसिंग मापारी यांनीही औटी यांच्या सुरात सूर मिसळून काहीतरी अघटीत घडल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, असे सांगितले. गांधीगिरी सोडून कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. परंतु, अण्णांच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारवर अशाच पद्धतीने दबाव वाढवावा लागेल असे शिवसेना नेते निलेश लंके यांनी सांगितले. पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी सरकारला  अण्णांची काळजी नसली तरी अम्हाला आहे. अण्णांच्याच आदर्शानुसार आंदोलने केली पाहिजेत, दगड उचलून तो दिल्लीपर्यंत पोहचणार नाही, असे ते म्हणाले. 
ग्रामसभा संपल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी राळेगणसिद्धी सोडून परत जावे, असे आवाहन उपसरपंच लाभेश औटी यांनी केले. तरीही पोलिस तेथेच थांबल्याने महिलांनी पुढे होत मंदिराच्या सुरक्षेसाठी असलेल्या 9 पोलिसांना तेथून दूर जाण्यास भाग पाडले. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गाडे यांनी त्या कर्मचार्‍यांना पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. तलाठी, ग्रामसेवक तसेच आरोग्य सेविकांनाही ग्रामस्थांनी गाव सोडण्यास भाग पाडले. सबाजीराव गायकवाड, डॉ. श्रीकांत पठारे, दिनेश बाबर, बापूसाहेब भापकर, शिवाजी व्यवहारे, दादासाहेब पठारे, राहुल शिंदे, संजय वाघमारे, विजय डोळ, गुलाबराव डेरे, इंद्रभान गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. 

तालुका बंदची हाक 

हजारे यांच्या आंदोलास पाठिंबा देण्यासाठी हजारे समर्थकांनी आज (दि.29) तालुका बंदची हाक दिली आहे.  प्रत्येक गावातील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून सरकारचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आलेे आहे. व्यवहार बंद ठेवून जेथे शक्य असेल, तेथे रास्ता रोको आंदोलन करण्याचेही आवाहन करण्यात आले. 
 


  •