होमपेज › Ahamadnagar › हजारेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीयांचा मोर्चा

हजारेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीयांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पारनेर : प्रतिनिधी     

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ काल (दि.26) सकाळी राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ, तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन शासनाचा निषेध केला. 

सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतिबा फुले चौकातूून मोर्चास प्रांरभ झाला. हजारे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. तेथे झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी आपले विचार मांडले. राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी म्हणाले, आजच्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाल्याने राळेगणसिद्धी परिवाराला ऊर्जा मिळते. नथूरामाच्या विचारांचा पुरस्कार करणारे हे सरकार उपोषणाच्या माध्यमातून अण्णांच्या जीवावर उठले असल्याचे भाकपचे संतोष खोडदे यांनी सांगतले. काँग्रेसचे राहुल झावरे म्हणाले, हजारे यांना आपल्या बळाची गरज नसून, सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांना बळ मिळावे म्हणून अण्णा आंदोलन करीत आहेत. तालुक्यात अण्णा हाच एकमेव पक्ष असून, अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पक्षीय अभिनिवेश दूर झाले आहेत. 

शिवसेनेच्या जयश्री औटी म्हणाल्या पाराशर ॠषी, सेनापती बापटांची या तालुक्याला पार्श्‍वभूमी असून, आता आमचा अंत पाहू नका. आम्ही पेटून उठलो, तर थोपविणे अशक्य होईल. राष्ट्रवादीचे दादासाहेब पठारे यांनी अण्णांचे हे आंदोलन कोणा एका व्यक्ती अथवा पक्षाविरोधात नसून, व्यवस्थेविरोधात असल्याचे सांगितले. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, सुभाष पठारे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश शेळके, रामदास भोसले, बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले, डॉ. श्रीकांत पठारे, सबाजी गायकवाड, अशोक घुले, दादा शिंदे, राहुल शिंदे, डॉ. रंगनाथ आहेर, नगराध्यक्षा सीमा औटी, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, शंकर नगरे आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. 

दोन दिवसांत ग्रामपंचायतींचे ठराव 

हजारे यांना पाठिंबा देणारे, तसेच सरकारचा निषेध नोंदविणारे सर्व ग्रामपंचायतींचे ठराव येत्या दोन दिवसांत सरकारदरबारी सादर करण्यात येतील, असे पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी सांगितले.
 


  •