Thu, Jul 18, 2019 06:25



होमपेज › Ahamadnagar › प्राचीन विठ्ठल मंदिरात विठू नामाचा गजर

प्राचीन विठ्ठल मंदिरात विठू नामाचा गजर

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 22 2018 12:15AM



टाकळीभान : विजय देवळालकर

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पुरातन  यादव कालीन व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 23  जुलै रोजी पहाटे 5 वा. श्री विठ्ठल रूख्मिणी यांच्या मूर्तींना गंगाजलाने स्नान, अभिषेक, महापूजा व प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांचे हस्ते आरती होणार आहे. दुपारी 12 वा. महाआरती, दुपारी 2 ते 5 भजन, 5 वा. दिंडी निघणार असून दिंडीची ग्रामप्रदक्षिणा झाल्यावर सायंकाळी 6 वा. आरती व रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे.

आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान येथील उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान दररोज भाविकांकडून अन्नदान केले जाते.दररोज सायंकाळी 5 वा. दिंडी काढली जाते. ग्रामप्रदक्षिणा करून दिंडी मंदिरात आल्यावर आरती होऊन महाप्रसाद दिला जोतो. चतुदर्शीच्या दिवशी भंडारा केला जातो. या दिवशी टाकळीभान व परिसरातील व अन्य  ठिकाणाहून भजनी मंडळ टाळ, मृदुंग, वीणा यासह दिंड्या घेऊन येतात. विठ्ठलाच्या दरबारी हजेरी लावतात. रात्रभर जागर करून सकाळी प्रसाद घेऊन जातात.

पौर्णिमेच्या दिवशी दहिहंडीच्या कार्यक्रमाने उत्साहाची सांगता होते. या दिवशी यमुना नदीकिनारी श्रीकृष्णाने जे खेळ खेळले होते ते खेळ दहिहंडीच्या वेळी खेळले जातात. त्यामुळे हे खेळ पाहण्यासाठी व दहिहंडीच्या प्रसादासाठी भाविक, ग्रामस्थ मोठी गर्दी करतात.टाकळीभान व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर फार पुरातन यादवकालीन आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचे असून मंदिरामध्ये दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. 

येथील श्री विठ्ठलाची मूर्ती ही शिल्पकला सांप्रदायाच्या शिल्प वैशिष्ट्यापेक्षा स्थानिक शिल्प वैशिष्ट्यांची छाप अधिक वाटते. ही मूर्ती विष्णू स्वरूपात असल्याची मोठी साक्ष आहे. आषाढी उत्सव हा येथील पर्वणीचा काळ असल्यामुळे भाविक, ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाले असले तरी या आषाढी उत्सव सोहळ्यासाठी ही मंडळी गावाकडे परत येतात.