Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Ahamadnagar › अपूर्णांकाचे वाटपही वादग्रस्त ठरणार?

अपूर्णांकाचे वाटपही वादग्रस्त ठरणार?

Published On: Jan 15 2018 1:40AM | Last Updated: Jan 14 2018 11:01PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

काँग्रेसच्या 2 नगरसेवकांवर कारवाई होऊन त्यांचे पद रद्द झाल्यानंतर त्याचा परिणाम स्थायी समितीच्या तौलानिक संख्याबळावर झाला आहे. स्थायी समितीत सदस्यमूल्याच्या आधारावर दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आहेत. मात्र, भाजप व काँग्रेसचे सदस्यमूल्य समसमान झाल्यामुळे अपूर्णांकाच्या वाटपात एका जागेचा ‘लाभ’ कुणाला? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अपुर्णांकाचे वाटपही वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. त्यातच काँग्रेसच्या गटनेत्यांचेच पद रद्द झाल्यामुळे गटनेता पदावरूनही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीच्या 5 सदस्यांची मुदत 31 जानेवारी रोजी संपुष्टात येत असल्याने तसेच चार जागा यापूर्वीच रिक्‍त असल्याने 9 सदस्य निवडीसाठी नगरसचिव कार्यालयाने प्रस्ताव तयार केला होता. मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार अपुर्णांकाचे वाटपही करण्यात आले होते. मात्र, प्रस्ताव महासभेकडे सादर होण्यापूर्वीच काँग्रेसचे नगरसेवक कोतकर यांचे पद रद्द झाले. त्यामुळे स्थायीचे पक्षनिहाय तौलानिक संख्याबळ नव्याने निश्‍चित करावे लागणार आहे. मनपातील एकूण 66 सदस्य संख्येच्या आधारवर 16 सदस्य असलेल्या स्थायी समितीसाठी 4.12 प्रति सदस्य मूल्य निर्धारीत करुन त्यानुसार प्रत्येक पक्ष किंवा गटाचे तौलानिक संख्याबळ निश्‍चित केले जाते. 

16 जागांपैकी शिवसेना 4, राष्ट्रवादी 5, भाजप 2, काँग्रेस 2 असे 13 जागांचे वाटप झाल्यानंतर उर्वरीत 3 जागांचे अपूर्णांकानुसार वाटप होते. त्यात 0.95 पक्षनिहाय सदस्यमूल्य असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1 जागा सोडण्यात येवून उर्वरीत 2 जागांपैकी 1 जागा शिवसेनेला दिली जाईल. त्यानंतर काँग्रेस व भाजपाचे पक्षनिहाय सदस्यमूल्य समसमान (2.18) असल्याने 1 जागेच्या वाटपावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने दर्जानुसारही वाटप करता येणे शक्य नाही. अशास्थितीत नगरसचिव कार्यालयाकडून या एका जागेच्या वाटपाबाबत काय प्रस्ताव दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसचे मनपातील संख्याबळ 9 वर आले आहे. कोतकर हे या गटाचे नेते होते. त्यांचे  पत्र नसल्यामुळे मागील सदस्य निवडीवेळी नूतन गटनेत्या सुवर्णा कोतकर यांचेही पत्र स्वीकारण्यात आले नव्हते. मात्र, आता कोतकर यांचे नगरसेवक पदच रद्द झाल्यामुळे काँग्रेस अंतर्गत नव्या-जुन्या गटनेत्याचा वाद संपुष्टात आला आहे. आगामी सदस्य निवडीवेळी नूतन गटनेता म्हणून सुवर्णा कोतकर यांचे पत्र स्वीकारणार की पक्षाचा नेता म्हणून शहर जिल्हाध्यक्षांचे पत्र स्वीकारले जाणार, या मुद्द्यावरुन नवा वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसची 1 जागा आधीच रिक्‍त असून दुसरीही रिक्‍त होणार आहे. त्यामुळे या दोन जागांवर सदस्यांच्या निवडी होणार की मागीलवेळी प्रमाणे दोन्ही जागा रिक्‍त ठेवल्या जाणार? हे पहाणेही महत्वाचे ठरणार आहे.