होमपेज › Ahamadnagar › नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीचाच : अजित पवार

नगर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीचाच : अजित पवार

Published On: Feb 15 2018 9:05PM | Last Updated: Feb 15 2018 9:05PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

 नगर लोकसभा मतदार संघाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. कोणत्याही स्थितीमध्ये  नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही. येथे राष्ट्रवादीचाच खासदार होईल असे सांगत  श्रीगोंदा-नगर मतदार संघाचे आमदार राहुल जगताप हेच होणार. असा ठाम विश्वास, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्रीगोंदा येथे आयोजीत केलेल्या हल्लाबोल आंदोलन प्रसंगी अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.

अजित पवार  म्हणाले, ‘‘गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीची जागा गेली तरी चालेल पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे कशी राहील यासाठी आम्ही युव्हरचना आखली होती. शिवाजीराव नागवडे, आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, तुकाराम दरेकर यांनी सहकार्य केले  आणि ते आमदार झाले. २०१९च्या निवडणुकीत  राहुल जगताप हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि तेच  आमदार होतील.’’ असे सांगत पवार यानी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी बाबत कोंडी फोड़ली.

आम्ही ज्यांना पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष केले ते तिकडे गेले, त्यांची सध्या काय अवस्था झाली आहे हे तुम्ही जवळून पाहता आहात.  नगर जिल्हाचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, आमदार संग्राम जगताप, वैभव पिचड यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरत कर्जमाफी करण्या भाग पाडले.

लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘‘नगरच्या जागेच्या बदल्यात इतर ठिकाणची जागा द्यायची अशा स्वरूपाची चर्चा चालू असल्याची माहिती मिळाली. पण असला प्रकार आपल्याला चालणार नसून, नगर दक्षिणेतून राष्ट्र्वादीचाच खासदार  होईल असे सांगत, त्याबाबत कुठलीच तड़जोड करणार नसल्याचे त्‍यांनी सांगितले.