Sat, Aug 24, 2019 21:39होमपेज › Ahamadnagar › पांगरमल प्रकरणी दोन पोलिस बडतर्फ 

पांगरमल प्रकरणी दोन पोलिस बडतर्फ 

Published On: Jul 01 2018 10:18PM | Last Updated: Jul 01 2018 10:19PMनगर : प्रतिनिधी

पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपींसोबत विशेष स्नेह ठेवल्याचा ठपका ठेवून पोलिस कर्मचारी जितेंद्र गायकवाड व शब्बीर शेख या दोघांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली.

नगर शहरात तोतयागिरी करणाऱ्या व पांगरमल दारूकांड प्रकरणातील एका आरोपीसोबत स्थानिक गुन्हे शाखेतील तत्कालीन कर्मचारी जितेंद्र गायकवाड व तोफखाना पोलिस ठाण्यातील कर्मचारी शब्बीर शेख यांचे अमर्यादित कॉल झाले होते.  या विषारी दारूकांडात पांगरमल येथील 9 व इतर ठिकाणचे 5 अशी एकूण 14 जण मयत झाले होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये विषारी दारूची निर्मिती करणाऱ्या आरोपींसोबत पोलिसांचे 'अर्थ'पूर्ण संबंध असल्याचा आरोप होत होता.  त्यावरून काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यावरून श्रीरामपूरच्या अपर पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करून काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यावरून दोन कर्मचार्‍यांना पोलिस खात्यातून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना पंधरा दिवसात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. काही कागदपत्रे उपलब्ध झालेली नसल्याने संबंधित पोलिस  कर्मचाऱ्यांनी मुदतवाढ मागितली होती.  त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हणणे सादर केल्यानंतर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी गायकवाड व शेख या दोघांविरुद्ध केल्याचा ठपका ठेवला होता. शनिवारी सायंकाळी दोघांविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात आली.