Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Ahamadnagar › नगर: बाबासाहेब वाकळे दुसर्‍यांदा सभापती; बिनविरोध निवड

नगर: बाबासाहेब वाकळे दुसर्‍यांदा सभापती

Published On: May 03 2018 1:21PM | Last Updated: May 03 2018 5:20PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत वाकळे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने आज (दि.4) होणार्‍या सभेत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, स्थायी समितीवर दुसर्‍यांदा सभापती होण्याचा मान वाकळे यांना मिळाला आहे.

स्थायी समितीच्या रिक्त जागांच्या निवडी झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी मे रोजी सभापती पदासाठी निवडणूक जाहीर केली होती. त्यात शिवसेनेच्या कोट्यातून समितीत प्रवेश केलेल्या भाजप नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी शिवसेना-भाजपच्या पाठबळावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनीही काही दिवसांपूर्वीच सभापती पदावर भाजपला संधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून आज होणार्‍या सभेत याची घोषणा केली जाणार आहे.

महापालिका अस्तित्वात आल्यापासून एकाही नगरसेवकाला दुसर्‍यांदा सभापती होण्याची संधी मिळालेली. वाकळे यांना यापूर्वी 2 ऑगस्ट 2012 ते 30 डिसेंबर 2013 या काळात सभापती पदावर भाजपकडून संधी मिळाली होती. तसेच जुलै 2011 ते 2 ऑगस्ट 2012 पर्यंत ते सभागृह नेता म्हणून कार्यरत होते. या पदावर असतांनाच त्यांना सभापती पदावर संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. वाकळे यांच्या रुपाने तब्बल 5 वर्षांनंतर भाजपला सभापती पदावर संधी मिळाली आहे. दरम्यान, सध्याच्या सभापती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय भाजपाने घेतला.

सत्तेत सहभागी न होण्याची घोषणाही शहर जिल्हाध्यक्षांनी केली होती. मात्र, वाकळे यांनी शिवसेनेच्या पाठबळावर दुसर्‍यांदा सभापती पदासाठी उमेदवारी केली. त्यामुळे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Tags :  ahmednagar municipal corporation, babasaheb wakle