Wed, Jul 08, 2020 03:40होमपेज › Ahamadnagar › नगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद

नगर : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद

Last Updated: Feb 24 2020 1:26AM
अहमदनगर : पुढारी ऑनलाईन 

ठराविक तारखांना स्त्री समागम केल्यास अमूक अमूक प्रकारची संतती होते, असे विधान केल्याने वादात सापडलेल्या निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावरील कारवाईचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. पीसीपीएनडीटी समितीची बैठक पुढील महिन्यात होईल, त्यात खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई होईल. खुलासा समाधानकारक असल्यास समिती निर्णय घेईल, अशी माहिती शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

दरम्यान, आज इंदोरीकर यांच्या समर्थनात अकोले बंदची हाक देण्यात आली आहे. भूमाता ब्रीगेडच्या तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. इंदोरीकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांना काळे फासू असे देसाई यांनी म्हटले होते. देसाई यांच्या वक्तव्यानंतर इदोरीकरांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला व आज (दि. २३) अकोले बंदची हाक दिली. इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, गावातून भजन दिंडी आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस मिळाल्याने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पीसीपीएनडीटी या समितीकडे खुलासा सादर केला आहे. काही माध्यमांनी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला असून, मी तसे बोललोच नव्हतो, असा दावा इंदोरीकर महाराजांनी समितीकडे केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दर दोन महिन्यांनी समितीची बैठक होत असते. आता पुढील बैठकीत खुलाशावर निर्णय अपेक्षित आहे. 

इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याला अंधश्रद्धा न्र्मिूलन समितीने आक्षेप घेतला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही पोलिसांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास महाराजांच्या गावात जाऊन त्यांना काळे फासणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अकोलेकरांनी रविवारी इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्याचे ठरवले आहे. सोमवारी भजन कीर्तन करीत मोर्चाही काढला जाणार आहे. त्या दृष्टीने  नियोजन केले जाते आहे. त्यासाठी गावोगावच्या ग्रामपंचायतींचे ठराव घेतले जात आहेत.

अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करुन दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.