Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Ahamadnagar › ‘अस्मिता’च्या कार्यक्रमाचा साहित्याअभावी बट्ट्याबोळ!

‘अस्मिता’च्या कार्यक्रमाचा साहित्याअभावी बट्ट्याबोळ!

Published On: Mar 09 2018 1:31AM | Last Updated: Mar 08 2018 11:41PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवी ते आठवीत शिकणार्‍या मुलींना अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुलींना देण्यासाठी अस्मिता कार्ड व सॅनिटरी नॅपकिनच उपलब्द्ध न झाल्याने कार्यक्रमाचा पुरता बट्ट्याबोळ उडाला. अध्यक्षा शालिनी विखेंनी भर कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए)च्या अधिकार्‍यांची कानऊघडणी केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार होता. महिला सक्षमीकरणाकडे शासनाची वाटचाल म्हणून राज्य शासनाने नुकतीच मुली व महिलांसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिन  सॅनिटरी नॅपकिन योजना सुरु केली आहे. राज्यभरात सर्व जिल्हा परिषदांमध्ये काल (दि. 8) या योजनेचा शुभारंभ करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते.

त्यानुसार कार्यक्रम ठेवण्यात आला खरा, मात्र कार्यक्रमासाठी उपस्थित मुलींना देण्यासाठी अस्मिता कार्ड व सॅनिटरी नॅपकिनच वेळेवर उपलब्द्ध झाले नाही. दरम्यान कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित इतर पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. अध्यक्षा विखे भाषणाला उभ्या राहिल्यानंतर मुलींना देण्यासाठी अस्मिता कार्ड व सॅनिटरी नॅपकिन उपलब्द्ध नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत प्रकल्प संचालक सुनिल गायकवाड यांच्याकडे त्यांनी विचारणा केली असता, राज्य स्तरावरूनच पुरवठा झाला नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या ना. विखेंनी अधिकार्‍यांचा चांगलाच समाचार घेतला. जर शासनाकडून अस्मिता कार्ड व सॅनिटरी नॅपकिन उपलब्द्ध करून देण्यात आलेले नाहीत तर मग योजनेच्या शुभारंभाची घाई कशाला? अशा शब्दात शालिनी विखेंनी अधिकार्‍यांना फटकारले.

जिल्हा पातळीवर महिला दिनानिमित्त अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजना अनावरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 6 वी ते आठवीत शिकणार्‍या 12 हजार 321 मुली आहेत. त्यांच्यासह आगामी काळात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनाही याचा लाभ होणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील ज्या मुलींना या सॅनिटरी नॅपकिनची खरेदी करायची आहे, त्या मुलींची नोंदणी अस्मिता अ‍ॅपवर करण्यात येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर संबंधित गावातील ज्या बचत गटाकडे काम देण्यात आले आहे, त्या गटाकडून अवघ्या पाच रुपयांमध्ये 8 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे.