Sun, Apr 21, 2019 00:24होमपेज › Ahamadnagar › कॅफोंवरील कारवाईमुळे प्रशासकीय कोंडी!

कॅफोंवरील कारवाईमुळे प्रशासकीय कोंडी!

Published On: Mar 09 2018 1:31AM | Last Updated: Mar 08 2018 11:39PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर अधिकारी- कर्मचार्‍यांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे प्रशासकीय नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. निलंबित झालेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे पदभार इतर अधिकार्‍यांवर सोपविण्यात आले. मात्र, काल (दि.8) मुख्य लेखाधिकार्‍यांवरही कारवाई झाल्यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांचा पदभार सोपवायचा कुणाकडे? असा सवाल उपस्थित झाला असून उपलब्ध अधिकार्‍यांमध्येच नियोजन करण्याचे आव्हान मनपा आयुक्तांसमोर आहे.

घोटाळ्या दोषी असलेल्या अभियंता रोहिदास सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे व लिपिक भरत काळे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांचा कार्यभार इतर अधिकारी, कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आला. त्यानंतर शासनाने सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांना निलंबित केले. त्यामुळे सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार आधीच प्रभारी असलेल्या नगरसचिव एस. बी. तडवी यांच्याकडे सोपविण्यात आला. तर उपायुक्त (सामान्य) पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला. आता लेखाधिकरी दिलीप झिरपे यांना पोलिसांनी घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यामुळे त्यांचा कार्यभार सोपवायचा कुणाकडे असा सवाल उपस्थित झाला आहे.

अतिरिक्त आयुक्त वालगुडे यांच्याकडे आधीच उपायुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. उपायुक्त ‘कर’चा कार्यभार असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या अधिपत्याखालीच लेखा विभागाचे काम चालते. त्यामुळे धनादेशांवर, बिले मंजूर करण्याच्या प्रस्तावांवर लेखाधिकार्‍यांसह त्यांच्याही सह्या असतात. त्यामुळे लेखाधिकार्‍यांचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविता येणे शक्य नाही. सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार असलेल्या तडवींकडे नगरसचिव पदाचाही कार्यभार आहे. तसेच प्रतिनियुक्तीवर असलेले नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष धोंगडे हेही दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे ‘कॅफों’चा कार्यभार त्यांचे समकक्ष अधिकारी मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांच्याकडे सोपविण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरु आहे. मात्र, ते स्वतःच हा कार्यभार स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून कॅफोंवर झालेल्या कारवाईनंतर खरात हेही रजेवर जाणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. ते रजेवर गेल्यास लेखाधिकार्‍यांचा कार्यभार सोपविणार कुणाकडे असा सवाल आहे.

दरम्यान, खरात यांच्या कार्यपध्दतीच्या धसक्याने त्यांच्याकडे कॅफोंचा पदभार नको, असा सूर पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे इतर अधिकार्‍याचा शोध सुरु असल्याचे समजते. काल सायंकाळी पदाधिकार्‍यांनी या बाबत आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याशी चर्चाही केली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कॅफोंच्या पदभाराबाबत निर्णय झाला नव्हता.