Mon, Jun 17, 2019 02:29होमपेज › Ahamadnagar › अधिकाऱ्यांच्या सद्बुद्धीसाठी जि. प. सदस्यांचे साईबाबांना साकडे

अधिकाऱ्यांच्या सद्बुद्धीसाठी जि. प. सदस्यांचे साईबाबांना साकडे

Published On: May 28 2018 2:04PM | Last Updated: May 28 2018 2:04PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी १० कोटी रुपये देण्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांचे निर्देश असतांना साईबाबा संस्थान मात्र निधी देण्यास कुचराई करत आहे. त्यामुळे संस्थानच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी यासाठी उद्या (दि. २९) जिल्हा परिषद सदस्य नगर ते शिर्डी पायी दिंडी काढणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.

विदर्भात कोट्यवधींचा निधी शिर्डी संस्थानने दिला असतांना जिल्ह्यातल्या शाळा खोल्यांसाठी निधी देण्यात येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेने शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडे निधीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन निधी देण्यास सांगितले असतानांनाही शिर्डी संस्थान निधी देत नाही. 

त्यामुळे शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना सद्बुद्धी मिळावी यासाठी नगरच्या जिल्हा परिषद मुख्यालयापासून ते शिर्डी साईबाबा मंदिरापर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्ले यांनी केले आहे.