Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : कुरियरचा स्फोट, तीन जखमी

अहमदनगर : कुरियरचा स्फोट, तीन जखमी

Published On: Mar 20 2018 11:24PM | Last Updated: Mar 21 2018 7:11AMअहमदनगर : प्रतिनिधी 

माळेवाडा परिसरातील मारुती कुरियर येथे स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी (दि. 20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दुकानाच्या पायऱ्यांवर रक्ताचा सडा पडला होता. जखमी तिघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक व निकामी पथकाकडून तपासणी सुरू आहे. मारुती कुरिअरच्या कार्यालयात पार्सल बॉक्समधील स्पीकरमध्ये व्हाईट पावडर असलेला पाईप होता. त्यातून स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरचे पार्सल हे नगरहून पुण्याला पाठविण्यात येत होते. पार्सलवरचे पत्तेही तपासण्यात येत आहेत. त्यानंतरच अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल असे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्फोटानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक झालेल्या या स्फोटाने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.