Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Ahamadnagar › विरोधकांचा डाव उधळून लावणार!

विरोधकांचा डाव उधळून लावणार!

Published On: Sep 15 2018 1:46AM | Last Updated: Sep 15 2018 1:46AMनगर : केदार भोपे

रावसाहेब रोहोकले यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांचा डाव पुरता उधळून लावण्याची तयारी सत्ताधारी संचालकांनी केली आहे. सभेत गोंधळ घालण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांच्या ‘मनसुब्यांना’ धुळीस मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी- पदाधिकार्‍यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

आलटून-पालटून सातत्याने सत्तेत असलेल्या व जिल्ह्यात ‘ताकदवान’ समजल्या जात असलेल्या विरोधकांना गेल्या निवडणुकीत रावसाहेब रोहोकले यांनी चांगलाच ‘धोबीपछाड’ दिला. ‘दारुण’ पराभव झाल्याने ‘नाचक्की’ झालेल्या विरोधकांनी पहिल्या सर्वसाधारण सभेत रोहोकलेंच्या ‘कलाने’ घेत सभा शांततेत पार पाडली. पहिल्या सभेत रोहोकले यांनी केलेल्या ‘दमदार’ नेतृत्वामुळे स्वतःचे नेतृत्व हरवते की काय? अशा चिंतेत सापडलेल्या विरोधकांनी ‘बे एके बे’ करत रोहोकले यांना टार्गेट करणे सुरु केले.

सत्ताधार्‍यांसह विरोधी असलेल्या सभासद, संचालकांमध्ये भेदभाव न करता रोहोकले यांनी सुरु केलेल्या ‘समझोता एक्स्प्रेस’चा विरोधकांनी चांगलाच धसका घेतलेला पाहावयास मिळाला. सत्तेपासून दूर राहण्याची सवय नसल्याने विरोधकांनी ‘मुद्यांवर’ चाललेली सभा दुसर्‍या वर्षी ‘गुद्यांवर’ आणली. व्हायचा तो गोंधळ झालाच. महिला सभासद, संचालक उपस्थित असल्याने पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप करत सभेवर ताबा घेतला. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच गोंधळ घालणार्‍या गुरुजींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे बँकेसह संचालक व सभासदांच्या इज्जतीचा ‘पंचनामा’ झाला.

यावर्षीही विरोधकांनी वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर ‘शाब्दिक हल्ला’ चढवत सर्वसाधारण सभापूर्व ‘रंगीत तालीम’ केली आहे. विरोधक ‘राडा’ करण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच अध्यक्ष रोहोकले यांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना सभेला बोलावून विरोधकांना ‘शह’ देण्याची चाल रोहोकले यांनी खेळली आहे. अधिकारी- पदाधिकार्‍यांना सभेत बोलावून त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचा रोहोकले यांचा ‘इरादा’ आहे. रोहोकले यांच्या निमंत्रणावरून अधिकारी-पदाधिकारी सभेला येणार का? याचीच आता उत्सुकता आहे.

सत्ताधार्‍यांमधून ‘फोडाफोडी’

सत्ताधार्‍यांच्या विरोधात मागील सभा संपल्यापासून विरोधकांचे ‘प्लॅनिंग’ सुरू आहे. त्यानुसार सत्ताधार्‍यांमधील संचालक, सभासद, गुरुमाऊली मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या ‘फोडाफोडी’ला वेग आला आहे. स्वतः सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे विरोधकांच्या ताफ्यात जाण्याच्या तयारीत आहेत. सत्ताधार्‍यांच्या विरोधात सर्व ‘टोपीवाले विरोधक’ एकत्र आणत गुरुकुल मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात चक्रव्यूह आखले खरे. पण विरोधकांनी सत्ताधार्‍यांचा वेध घेण्यासाठी आखलेल्या या चक्रव्यूहात विरोधकांनाच अडकवत त्यांचे ‘गाभारे उद्ध्वस्त’ करण्याची खेळी सत्ताधार्‍यांनी केली आहे.