Fri, Jul 19, 2019 23:19होमपेज › Ahamadnagar › बससेवेसाठी नव्या अभिकर्त्याचा शोध!

बससेवेसाठी नव्या अभिकर्त्याचा शोध!

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 05 2018 12:03AMनगर : प्रतिनिधी

शहर बससेवेसाठी नव्याने निविदा मागविण्याचे आदेश स्थायी समितीने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने नवीन अभिकर्त्याचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून यात नुकसान भरपाईबाबत कुठलाही उल्लेख नसल्याने नवीन अभिकर्त्याला नुकसान भरपाई देणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ‘यशवंत अ‍ॅटो’ मार्फत सध्या शहरामध्ये बससेवा सुरु आहे. त्यासाठी मनपाकडून दरमहा 5 लाख रुपयांची नुकसान भरपाईही संस्थेला दिली जाते. मात्र, सध्या बहुतांशी बसेसची दुरवस्था झाली आहे. निविदेतील अटींनुसार किमान 15 बसद्वारे सेवा पुरविणे आवश्यक असतांनाही 7 ते 8 बसेसद्वारेच सेवा दिली जात असल्याचे चित्र आहे. काही बसेस पूर्णपणे नादुरुस्त होवून अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. 

याबाबत स्थायी समितीमध्ये झालेल्या चर्चेनंतर संबंधित ठेकेदाराला बसच्या दुरुस्तीची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही सुधारणा झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यावर स्थायी समितीने नवीन संस्थेच्या शोधासाठी निविदा मागविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. ‘स्थायी’च्या आदेशनुसार मनपाच्या मोटर व्हेईकल विभागामार्फत बससेवा पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र, निविदेच्या अटी-शर्तींमध्ये नुकसान भरपाई दिली जाणार किंवा नाही, याबाबत कुठलाही उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या सेवा पुरविणार्‍या अभिकर्ता संस्थेला गेल्या अनेक महिन्यांपासून नुकसान भरपाई देणे बंद करण्यात आले आहे.