Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › जिल्हा विभाजन हा तर ‘चुनावी जुमला’!

जिल्हा विभाजन हा तर ‘चुनावी जुमला’!

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:47PMनगर : प्रतिनिधी

आघाडी सरकारच्या काळातही नगर जिल्हा विभाजनाची चर्चा होती. मात्र, ठाण्यातील परिस्थिती पाहून तेवढा एकच निर्णय घेतला गेला. सध्या राज्य सरकारवरील कर्ज 8 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. अशा स्थितीत जिल्हा विभाजनाचा आर्थिक भार सोसण्याची ताकद नाही, सरकारला तो परवडणारा नाही. हा केवळ ‘चुनावी जुमला’ असून प्रश्‍नांवरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याच्या शब्दांत ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाची शक्यता फेटाळून लावली आहे.

नगर येथील पत्रकार परिषदेत काल (दि.15) ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, 15 वर्षांत विभाजनाचा एकच निर्णय घेतला गेला. नगरचा विषयही त्यावेळी चर्चेत होता. मात्र, विभाजनाचे इतरही प्रस्ताव आहेत. त्यामुळे एकट्या नगरचा निर्णय होऊ शकत नाही. त्यातच सध्याची राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता विभाजनाचा भार सोसण्याची ताकद सरकारमध्ये नाही. कर्ज 8 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. उत्पन्न घटले आहे. त्यातच 7 व्या वेतन आयोगाचा निर्णय घेतला गेला आहे. बजेटलाही कात्री लावली जात आहे. त्यामुळे सध्या विभाजन करता येईल, अशी आर्थिक परिस्थिती नाही. हा केवळ चुनावी जुमला आहे. तसेच राज्याच्या प्रमुखांनी याबाबत सूतोवाच केले असते, तर ते विचार करण्यासारखे आहे, अशा शब्दांत पवार यांनी जिल्हा विभाजनाची शक्यता फेटाळून लावली आहे.

खापर फोडण्याचे धंदे आता बंद करा!

राज्यात सर्वाधिक महागाईची झळ सोसावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यात. गॅसचे दर दुप्पट झालेत. अशा स्थितीत मागच्यांनी काय केले? असे म्हणत आमच्यावर खापर फोडण्याचे धंदे आता बंद करा. जनतेनी तुम्हाला निवडून दिलेय. 4 वर्षांत तुम्ही काय दिवे लावलेत? असा सवाल करत राज्यातील समस्यांवर बोलण्याचे टाळून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.