Tue, May 21, 2019 22:48होमपेज › Ahamadnagar › ‘नगर दक्षिण’ची जागा ‘राष्ट्रवादी’चीच! : मधुकरराव पिचड 

‘नगर दक्षिण’ची जागा ‘राष्ट्रवादी’चीच! : मधुकरराव पिचड 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 11:07PMनगर : प्रतिनिधी

कोणीही उमेदवारी जाहीर केली, तरी नगर दक्षिण लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे व राहणार आहे. आघाडीबाबत व उमेदवाराबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे निर्णय घेतील. कुणाला उमेदवारी करायची असेल तर त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करावा. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये फिरल्याने कुणी खासदार होत नाही आणि तिकीटही मिळत नाही, काँग्रेसनेही उमेदवारी ठरविण्याचे अधिकार स्थानिक किंवा राजय पातळीवर दिलेले नाहीत, असा टोला माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला आहे.

माजीमंत्री पिचड यांनी काल (दि.7) पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन जामखेड हत्याकांड व केडगाव हत्याकांडाविषयी माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आघाडीचा निर्णय खा.पवार व खा. राहुल गांधी  घेणारच आहेत. दक्षिण लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा  असून या ठिकाणी राष्ट्रवादीच ही जागा लढवेल. तर शिर्डीची जागा काँग्रेस लढवेल. दक्षिण मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक आहेत. योग्य व सक्षम उमेदवार देण्यात येईल. जे कोणी इतर पक्षातील इच्छुक असतील, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी मागणी करावी, असे म्हणाले.

पोलिस अधीक्षकांशी केली चर्चा

जामखेड हत्याकांड प्रकरणातील पकडण्यात आलेल्या आरोपींबाबत आम्ही समाधानी नाही. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी. जामखेड हत्याकांडाचा तपास हा सक्षम अधिकार्‍यांकडे द्यावा, अशी मागणी पिबड यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. पोलिस अधीक्षक कार्यालयावरील दगडफेक व केडगाव येथील दगडफेक प्रकरणात 308 कलम लावण्यात आले. सेनेच्या कार्यकर्त्यांवरील कलम वगळले. मात्र, राष्ट्रवादीचे वगळले नाही. ते तात्काळ वगळावे. पोलिसांनी एकतर्फी कारवाई न करता केडगाव दगडफेक प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरील कलमही वागळण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

छगन भुजबळ पुन्हा सक्रिय होणार!

माजीमंत्री छगन भुजबळ यांना पक्षात आजही आदराचे स्थान आहे. त्यांना पक्षाने वार्‍यावर सोडलेले नाही. ते दोषमुक्‍त होतील, अशी अपेक्षा आहे. भुजबळ हे पक्ष सोडणार असल्याच्या केवळ वावड्या आहेत. ते शरद पवार यांना कधीही दगा देणार नाहीत. लवकरच ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील, असे मधुकरराव पिचड यांनी यावेळी स्पष्ट केले.