Thu, Nov 15, 2018 16:38



होमपेज › Ahamadnagar › बॉम्बस्फोट केंद्रस्थानी रेडिओ

बॉम्बस्फोट केंद्रस्थानी रेडिओ

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 23 2018 11:59PM



नगर : प्रतिनिधी

माळीवाड्यातील स्फोटात बॉम्ब ठेवण्यासाठी एफएम रेडिओ संचाचा वापर करण्यात आलेला आहे. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी हा संच महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे रेडिओ खरेदी करणार्‍याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या रेडिओची राज्यातील फक्त दोनच शहरांत ‘डिलरशिप’ आहे. त्यामुळे या शहरांवर तपास केंद्रीत झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.

मारुती कुरियरमध्ये झालेल्या स्फोटातील बॉम्ब हा एफएम रेडिओ संचात बसविण्यात आलेला होता. या कुरियर दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, म्हणून घातपाताचा कट रचणार्‍यांनी त्या दुकानाची निवड केलेली असावी, असा संशय आहे. परिसरातील दुकानांतही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पोलिसांनी माळीवाडा परिसरातील अनेक दुकानांचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलेले आहे. हे दुकान व परिसरात कॅमेरे नसल्याने इतर रहदारीच्या रस्त्यावरून कुरियर घेऊन येणार्‍यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परंतु, या गुन्ह्याच्या तपासात स्फोटासाठी वापरलेला रेडिओ महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

हा रेडिओ कोठे-कोठे मिळू शकतो, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.  या रेडिओ कंपनीचे मुख्यालय दिल्लीस्थित आहे. महाराष्ट्रातील फक्त दोनच शहरांत त्या रेडिओची ‘डिलरशीप’ आहे. त्या दुकानांतील सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतले आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसमोरील आव्हान कायम आहे. तो रेडिओ खरेदी करणारा व्यक्ती घातपाताच्या कटात सहभागी असू शकतो. त्यामुळे या कंपनीचा रेडिओ मिळत असलेल्या शहरांभोवती ‘एटीएस’ने तपास केंद्रीत केला आहे. 

सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावाने पार्सल बॉम्ब नगरमधून पाठविण्यात येणार होता. असे असलेतरी दुकानात पार्सल घेऊन येणारी व्यक्ती ही नगरमधीलच आहे, असा पूर्णपणे दावा करता येणार नाही.
 

tags : ahamadnagar,news, Maliwada, area, Maruti ,courier ,bomb, explosion,