Wed, Jul 17, 2019 18:29होमपेज › Ahamadnagar › साखर कारखान्यांवरच कारवाई करा

साखर कारखान्यांवरच कारवाई करा

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:22PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने आदेश देवूनही, जिल्हाभरात ट्रॅक्टर आणि बैलगाड्या रिफ्लेक्टरविना ऊसवाहतूक करत असल्याचा आरोप जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी केला. या आरोपाची दखल घेऊन, जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सदर गाड्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या साखर कारखान्यांवरच कारवाई करण्याचे निर्देश आरटीओ विभागाला दिले आहेत. जिल्हाभरात सध्या ऊसगाळप हंगाम सुरु असून, साखर कारखान्यांसाठी   ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांद्वारे ऊसवाहतूक केली जात आहे. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अशा तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी संबंधित ऊसवाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टि टेप्स लावण्याच्या सूचना जिल्हाभरातील सर्वच साखर कारखान्यांना यापूर्वीच दिलेल्या आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात काल (दि.5) जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत, परिषदेचे सदस्य कारभारी गरड, अरुण कुलथे, जालिंदर वाघचौरे, उमा मेहेत्रे, अशोक गायकवाड, शिरीष बापट आदीसह सर्व सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. साखर कारखान्यांसाठी उसपुरवठा करणारी वाहने रिफ्लेक्टरविना रस्त्यांवर धावत आहेत.

रिफ्लेक्टर टेप्स लावण्याचे निर्देश दिले असताना देखील, याचे पालन होत नसल्याचा आरोप सदस्यांनी बैठकीत केला. अद्यापही अशी वाहतूक सुरु असेल तर संबंधित वाहनांवर आणि साखर कारखान्यांवर देखील कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महाजन यांनी आरटीओ विभागाला दिले आहेत.  जिल्ह्यातील वीज, रस्ते, अन्नधान्य भेसळ आणि धोकादायक वाहतूकीबाबत  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत चिंता व्यक्‍त केली. ठिकठिकाणी वीज वितरण मंडळाचे ट्रान्स्फॉर्मर बंद अवस्थेत आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी महावितरणला जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा प्रश्न महत्वाचा असल्याने तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी महाजन यांनी महावितरणला दिल्या आहेत. .