होमपेज › Ahamadnagar › गुंजाळला पिस्तुल देणारा अटकेत

गुंजाळला पिस्तुल देणारा अटकेत

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयतांवर गोळ्या झाडणारा आरोपी संदीप गुंजाळ याला देशी बनावटीचा पिस्तुल विक्री करणार्‍या बाबासाहेब विठ्ठल केदार  (वय 38, रा. अंबिकानगर, केडगाव, मूळा रा. निमगाव वाघा, ता. नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि. 11) दिवसभर त्याची कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा खुनाच्या गुन्ह्यात त्याच्या अटक कार्यवाही करण्यात आली आहे.

केडगाव हत्याकांडातील आरोपी गुंजाळ हा वारंवार वेगवेगळ्या साथीदारांची नावे सांगून पोलिसांची दिशाभूल करीत आहे. मात्र, त्याने पिस्तुल देणार्‍याचे नाव खरे सांगितले आहे. मंगळवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशावरून विशेष पोलिस पथकाने बाबासाहेब ऊर्फ बाबा केदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गेल्यावर्षी गुंजाळ याला गावठी कट्टा विक्री केल्याची कबुली दिली आहे. विशेष तपास पथकाने बुधवारी दिवसभर त्याची चौकशी केली. मयतांवर गोळ्या झाडणार्‍या गुंजाळ याला पिस्तुल पुरविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा बाबा याच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

बाबा केदारी याला अटक केल्यानंतर केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, संदीप गुंजाळ,भानुदास महादेव ऊर्फ बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदतही गुरुवारी (दि. 12) संपत आहे. या पाचही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.