Wed, Feb 26, 2020 02:52होमपेज › Ahamadnagar › आरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत 

आरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत 

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 10:58PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळ याला मानसशास्त्रीय चाचणीवर म्हणणे सादर करण्यासाठी काल (दि. 5) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. परंतु, त्याच्या वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे पुढील सुनावणी सोमवारी (दि. 7) ठेवण्यात आली आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांना शरण आलेला गुंजाळ हा पोलिस कोठडीत असताना तो स्वतःचा जबाब वारंवार बदलत होता. त्यामुळे पोलिस कोठडीत दिलेल्या जबाबापैकी गुंजाळ याचा खरा जबाब कोणता आहे, हा प्रश्‍न पोलिसांनाही पडला आहे. नेमका घटनाक्रम कसा घडला, याची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी संदीप गुंजाळ याच्या मानसशास्त्रीय चाचण्या करण्यास परवानगी देण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात दिला होता. त्या अर्जावर शनिवारी (दि. 5) सुनावणी होती. न्यायालयाने आरोपी गुंजाळ याचे म्हणणे मागितले होते. 

शनिवारी होणार्‍या सुनावणीसाठी आरोपी गुंजाळ यालाही न्यायालयात आणण्यात आले होते. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार हेही सुनावणीसाठी उपस्थित होते. न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपी गुंजाळ याच्या वकिलांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी होणार आहे. 

पोलिसांत हजर झाल्यानंतर संदीप गुंजाळ याने दोनही खून स्वतःच केल्याचा दावा केला होता. तपासात त्याने संदीप गिर्‍हे हाही खुनात सहभागी असल्याचे सांगितले होते. मात्र, गिर्‍हे याने त्याचा दावा फेटाळून लावला आहे.