Tue, Apr 23, 2019 07:57होमपेज › Ahamadnagar › आरोपींचा शोध संशयाच्या भोवर्‍यात!

आरोपींचा शोध संशयाच्या भोवर्‍यात!

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 11 2018 10:50PMनगर : प्रतिनिधी

आरोपी अभियंता रोहिदास सातपुते यांच्या स्वाक्षरीने महापालिकेत दाखल झालेला अर्ज, त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावेळी तात्पुरत्या जामिनानंतर घटनास्थळ पाहणीसाठी दर्शविलेली तयारी, यातून पोलिस दफ्तरी फरार आरोपी सातपुते नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच आणखी एक आरोपीही शहरात त्याच्या नातेवाईकांकडेच वास्तव्यास असल्याची खात्रीलायक चर्चा मनपा वर्तुळात आहे. तरीही हे आरोपी हाती न लागल्याने तपास यंत्रणेची शोधमोहिम संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. 

मनपा आयुक्तांच्या फिर्यादीवरून पथदिवे घोटाळ्यात दोन अधिकारी, एक लिपिक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील फक्त लिपिकालाच अटक करण्यात आलेली आहे. त्याचा गुन्ह्यातील सहभाग मर्यादीत स्वरुपाचा आहे. परंतु, अभियंता रोहिदास सातपुते, विद्युत पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, ठेकेदार सचिन लोटके यांचा गुन्ह्यातील सहभाग हा गंभीर स्वरुपाचा आहे. मात्र अद्यापही त्यांना पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आलेले नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपी, सराईत दरोडेखोर हे पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी मोबाईलसह इतर तांत्रिक साधने व नातेवाईक यांच्या संपर्कात राहत नाही. तरीही ते पोलिसांच्या हाती लागतात. परंतु, सराईत गुन्हेगार नसलेले, अधिकारी असलेले व नातेवाईकांच्या संपर्कात राहून महापालिकेत अर्ज करणारे, न्यायालयात तात्पुरत्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून घटनास्थळ पाहणीस तयार असल्याचा दावा करणारे आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत, यातून शंका उपस्थित केली जात आहे.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी नगर शहरात वावरत असल्याची जोरदार चर्चा आहे. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपासून एका स्नेहीजवळ वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. तरीही तो आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. फरार तीन आरोपींपैकी एक वगळता इतर दोघे नगर शहर व पसिररात वास्तव्यास असतानाही, ते पोलिस दफ्तरी फरार असणे तर्कविर्तकांना बळ देणारे आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झालेली नाही. 

या गुन्ह्यात उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांचा दोष असून, त्यांनाही लवकरच आरोपी केले जाणार असल्याचे तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांनी स्पष्ट केलेले होते. यातून या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते. गुन्हा दाखल होऊन जवळपास 12 दिवस पूर्ण झालेले आहेत. केवळ लिपिक दर्जाच्या व मर्यादीत अधिकारक्षेत्र असलेल्याच आरोपीला अटक झालेली आहे. मात्र, काल्पनिक व न झालेल्या कामांची बिले मंजूर करून ती देणार्‍या अधिकार्‍यांना अटक न होणे, हा प्रकार अनेक आरोपांना बळ देणारा आहे.