होमपेज › Ahamadnagar › गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा अपघात टळला

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा अपघात टळला

Published On: Jan 12 2018 1:50AM | Last Updated: Jan 11 2018 11:16PM

बुकमार्क करा
श्रीगोंदा : प्रतिनिधी 

नगर-दौंड रेल्वेमार्गावर घारगाव शिवारात चालकाच्या प्रसंगावधानामुळे गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेसला होणारा मोठा अपघात टळला. काल (दि.11)सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. नव्याने झालेल्या पुलावरील रूळाला तडा गेल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने, त्याने तात्काळ रेल्वे थांबविली. तरीही रूळाबरोबरोबर रेल्वेचे इंजिन खचले होते. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नगर-दौंड रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी पुलांचे बांधकाम सुरू आहे. 

या रेल्वे मार्गावर असलेले रेल्वे फाटक बंद करून, त्या ठिकाणी पुलांचे बांधकाम केले जात आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारातील गेट क्र.14 येथे पुलाचे काम काल(दि.11) पूर्ण झाले. या पुलाचे काम चालू असल्याने या रेल्वेमार्गावर दुपारी 12 वाजल्यापासून मेगाब्लॉक घेण्यात आलेला होता. त्यामुळे दौंडकडे जाणारी गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस विसापूर रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आली होती. दरम्यान, पाच वाजता पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर, गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस विसापूर स्थानकावरून दौंडकडे मार्गस्थ झाली. 

पुलाचे काम नवीन असल्याने चालकाने रेल्वेचा वेग कमी ठेवलेला होता. रेल्वे  पुलावर येताच रुळाला तडा गेल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. त्याने तात्काळ रेल्वे थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, तरीही रेल्वेचे इंजिन रूळाबरोबर खचले. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अपघात टळला. सायंकाळी उशिरा इंजिन बाजूला काढून, रेल्वे पुन्हा विसापूर स्थानकात आणण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत रूळ दुरुस्तीचे काम चालू होते. पुलाच्या बांधकामाची चाचणी न घेताच त्यावरून ही रेल्वे सोडण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.