Mon, Apr 22, 2019 16:35होमपेज › Ahamadnagar › ट्रॅक्टरच्या धडकेने विद्यार्थिनी ठार

ट्रॅक्टरच्या धडकेने विद्यार्थिनी ठार

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 09 2018 11:43PMकर्जत/सिध्दटेक : प्रतिनिधी

तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याच्या परिसरामध्ये काल (दि. 9) सकाळी साडेनऊ च्या सुमारास आकांक्षा संजय साबळे (वय 17, रा. बारडगांव सुद्रिक) या आकरावीतील विद्यार्थिनीचा महाविद्यालयातून घरी परतत असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाला. अपघाता नंतर चालक पळून जात असल्याचे पाहून संतप्त नागरीकांनी उसासह ट्रॅक्टर पेटवून दिला.
या बाबत कचरू मल्हारी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी नात आकांक्षा संजय कांबळे ही अंबालिका साखर कारखान्यालगत असलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत होती. काल सकाळी साडेनऊच्या सुमारास ती कॉलेजमधून घरी परत येत होती. त्यावेळी तिच्या हातामध्ये सायकल होती. ती रस्त्याच्या कडने पायी चालत असताना विना क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने तिला धडक दिली. ट्रॅक्टरसोबत उसाने भरलेल्या 2 ट्रॉली जोडलेल्या होत्या. चालकाने आकांक्षा हिस जोराची धडक दिली. त्यामध्ये तिच्या हात, पाय, पोट व कंबरेला जबर मार लागला. अपघात होताच सर्वजण घटनास्थळी धावले. नंतर तिचे वडील संजय साबळे, चुलते नाना साबळे यांनी आकांक्षाला वाहनामधून तातडीने दौंड येथे उपाचारासाठी दवाखान्यात नेले. दौंड येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या अपघाता नंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहून जमावाने ट्रॅक्टर पेटविला.