Fri, Mar 22, 2019 05:45
    ब्रेकिंग    



होमपेज › Ahamadnagar › झेडपीत आंदोलन; १६ जणांविरुद्ध गुन्हा

झेडपीत आंदोलन; १६ जणांविरुद्ध गुन्हा

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 10:50PM



नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत आंदोलन करणार्‍या नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील 16 आंदोलकांविरुद्ध सरकारी कामात अथडळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शामराव शिर्के यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बाबासाहेब आसाराम रावडे (वय 54), सोपान बाबासाहेब रावडे (वय 26), नामदेव आसाराम रावडे (वय 40), रामदास आसाराम रावडे (वय 35), तान्हाजी आसाराम रावडे (वय 45), किशोर तान्हाजी रावडे (वय 45), मंदा रामदास रावडे (वय 32), अलका बाबासाहेब रावडे (वय 45), सिंधू तान्हाजी रावडे (वय 40), नंदाबाई नामदेव रावडे (वय 40), योगिता सोपान रावडे (वय 23), वर्षा नामदेव रावडे (वय 19) व इतर चार अल्पवयीन मुलांचा (सर्व  रा. कांगोणी, ता. नेवासा) समावेश आहे.

याबाबात कोतवाली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कांगोणी येथील रावडे कुटुंबियांनी गुरुवारी (दि. 8) दुपारी पावणेएक ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनाशेजारी असलेल्या अभ्यागत कक्षात आंदोलन केले होते. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मागे घ्यावा, खोटे गुन्हे दाखल झाल्याने अब्रुनुकसानीपोटी कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये द्यावे, रावडे कुटुंबियांच्या मालकीच्या मिळकतीतून जाणारा अनधिकृत रस्ता बंद करण्यात यावा आदी मागण्यासांठी आंदोलन सुरू केले होते. आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली होती. प्रशासनविरोधी घोषणा देऊन प्रशासनास जाणीवपूर्वक वेठीस धरले होते. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिर्के यांनी उपोषण करू नये, याबाबत विनंती केली. ही अमान्य करून आंदोलकांनी सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिर्के यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याशी चर्चा करून फिर्याद दिली. त्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे करीत आहेत.