Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Ahamadnagar › जिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’!

जिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’!

Published On: Dec 15 2017 2:42AM | Last Updated: Dec 14 2017 11:07PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील बर्‍याच वर्षांपासून रिक्त असलेल्या 627 पदांच्या ‘मेगा भरती’ला ‘ब्रेक’ लागला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने भरतीसाठी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाकडून ‘थंड बस्त्यात’ टाकण्यात आला असून, राज्यभरात एकाच वेळेस भरती प्रक्रिया घेण्याची तयारी सुरु आहे. त्यातच कर्जमाफी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडल्याने, किमान वर्षभर तरी भरती होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.

अनेक वर्षांपासून रिक्त असलेली 627 पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता. मात्र प्रस्तावाला अजूनही ‘हिरवा कंदील’ मिळालेला नाही. यावर्षीच्या शासन निर्णयानुसार वर्ग- 3च्या पदांसाठी आता राज्य सरकारतर्फे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून, यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी असलेल्या अधिकार्‍यांच्या समितीचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या अधिनस्त विभागांमध्ये वर्ग - 3 संवर्गाच्या तब्बल 627 जागा रिक्त आहेत. यापूर्वी या जागा भरण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची नेमणूक होती. या निवड समितीमार्फत सर्व विभागांच्या वर्ग 3 च्या पदांची भरती करण्यात येत. अशा प्रकारे भरती करत असतांना परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे इत्यादी बाबींसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचा बराच वेळ वाया जात होता. त्याचा परिणाम विकासकामांवर होत होता.

त्यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग 3 च्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार 19 ऑकटोबर 2007 च्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीच्या कक्षेतून जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 च्या पदांची भरती वगळण्यात आली आहे. मात्र राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी भरतीची प्रक्रिया तात्पुरती तरी थांबविण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.

निवड केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या मार्फत तपासण्यात येणार आहेत. परीक्षेचा निकाल हा ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहे. तपासणीनंतर ज्यांची कागदपत्रे सेवा प्रवेश नियमानुसार योग्य असतील त्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. मात्र भरती प्रक्रियेला हिरवा कंदील कधी मिळतो यावर पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.