Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › पदाधिकार्‍यांचा ‘शिक्षक दरबार’!

पदाधिकार्‍यांचा ‘शिक्षक दरबार’!

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्‍न चिघळत चाललेला असतांना जिल्हा परिषदेत पदाधिकार्‍यांनी ‘शिक्षक दरबार’ भरविला. यावेळी विस्थापित झालेल्या शिक्षकांनी संवर्ग 1 व 2 मधील बोगस शिक्षकांवर कारवाई करण्याचे साकडे पदाधिकार्‍यांना घातले.

संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांमध्ये अनेकांनी चुकीची माहिती दिली आहे. यामुळे प्राथमिक शिक्षकांना विस्तापित होण्याची वेळ आली आहे. यामुळे चुकीची माहिती देणार्‍या बोगस शिक्षकांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या जागी विस्तापित शिक्षकांना नेमणुका द्या, अथवा झालेली ही भरती रद्द करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करा, अशी मागणी जिल्ह्यातील 620 शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्याकडे केली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सदस्या हर्षदा काकडे आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या वतीने नारायण पिसे, संजय धामणे, विजय नरवडे, संभाजी जाधव, श्रीकांत गायकवाड ज्ञानेश्वर सोनवणे मेघाली बच्छाव, अर्चना ठाणगे सविता वराडे सविता देशमुख वृषाली वैशाली गुंड या विस्थापित शिक्षकांसह शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, बापूसाहेब तांबे, संजय धामणे, परसराम तांबे आदींनी बाजू मांडली. महिला शिक्षकांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

विस्थापित शिक्षकांचे म्हणणे एकून घेत याबाबत ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले. विस्थापित शिक्षकांनी काल (दि. 11) सकाळपासून जिल्हा परिषदेच्या आवारात  बेमुदत उपोषण सुरू केले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 28 मे रोजी करण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 व संवर्ग 2 मधील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर खोटे पुरावे सादर करून बदल्या करून घेतल्या आहेत. त्यामुळे 620 शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले. त्यांना आता केवळ गैरसोयीचे व अवघड क्षेत्रातील जागा शिल्लक आहेत. त्यामुळे हे विस्थापित शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

संवर्ग-1 मध्ये बदली प्रक्रियेत लाभ घेतलेल्या शिक्षकांची पडताळणी न करता केवळ शिक्षकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या संवर्गातील अपंग शिक्षक व दुर्धर आजारी शिक्षक यांची सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत तपासणी करून प्रमाणपत्राची पडताळणी व्हावी. काही शिक्षकांनी अपंगांच्या खोट्या प्रमाणपत्राचा आधार घेतला असून काहींनी आजारी नसताना दुर्धर आजारी असल्याचे खोटे नमूद करून सवलत घेतली आहे. या सर्वांची चौकशी व्हावी. संवर्ग दोन मध्ये बदलीसाठी पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेतलेल्या अनेक शिक्षकांची चुकीची अंतरे दाखवून बदली करून दुसर्‍या शिक्षकाला विस्थापित केले आहे. या शिक्षकांनी दाखवलेली अंतरे गुगल मॅपच्या द्वारे पडताळून पाहावी, तसेच संवर्ग 2 मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदारापासून 30 किमीच्या परिघातील शाळा घेणे अपेक्षित होते पण बरेच शिक्षकांनी 30 किमीच्या बाहेरील शाळा घेतल्या आहेत, अशांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली.