Wed, Jul 17, 2019 10:13होमपेज › Ahamadnagar › खुल्या प्रवर्गातील २८३ जागा वाढल्या

खुल्या प्रवर्गातील २८३ जागा वाढल्या

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Mar 01 2018 12:20AMनगर : प्रतिनिधी

रोस्टरच्या चौकशीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गामध्ये खुल्या प्रवर्गातील 283 जागा वाढल्या आहेत. शिवप्रहार संघटनेने याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांचा मोठा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

आंतरजिल्हा बदली टप्पा 1 च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्ययावत करताना मोठ्या प्रमाणावर अनागोंदी, गैरकारभार झाल्याने खुल्या प्रवर्गातील प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीपासून वंचित राहावे लागले होते. सदर बाब प्राथमिक शिक्षकांच्या बिंदूनामावलीतील अनियमिततेमुळे घडल्याचे लक्षात आल्यानंतर शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी  20 जुलै  2017 च्या माहिती अधिकार पत्रातून जिल्हा परिषद शिक्षकांची बिंदूनामावली सन 2009 व 2016, तसेच ज्या पुराव्यांच्या आधारे बिंदूनामावली अद्ययावत केली जाते, अशा सर्व निवडसूची यांची सुमारे सहा ते सात हजार पानांची माहिती मिळविली. भोर यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रवर्गातील काही शिक्षकांच्या सहभागातून सर्व पुरावे व बिंदूनामावलीची अहोरात्रपणे काटेकोर तपासणी करण्यात आली.

यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक संवर्गाची बिंदूनामावली बनविताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार व अनागोंदी होऊन त्यात हेतूपुरस्सरपणे खुल्या प्रवर्गावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याची लेखी तक्रार शिवप्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे 23 ऑक्टोबर 2017 रोजी दाखल करण्यात आली. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भोर यांनी 12 नोव्हेंबर 2017 रोजी समक्ष भेट घेऊन सदर गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शासनाच्या 29 नोव्हेंबर 2017 च्या पत्रानुसार नगरसह विविध जिल्ह्यांतील बिंदूनामावलीबाबत आस्थापना उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. 

यावेळी शिवप्रहार संघटनेकडून चौकशी समिती सदस्य तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी समितीसमोर बाजू मांडण्याची संधी मिळण्याची विनंती करण्यात आली. या समितीने चौकशीच्या अनुषंगाने  8 जानेवारी  2018 रोजी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. यात प्रामुख्याने मागासवर्गीय शिक्षकांना खुल्या बिंदूवर दर्शविणे, नावे दुबार असणे, वस्तीशाळा शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे त्यांच्या प्रवर्गात न दाखवता खुला बिंदू दर्शविणे, काही कर्मचार्‍यांची जात बदललेली असणे,   सेट 2010 अंतर्गत मागास प्रवर्गात निवड झालेल्या शिक्षकांना खुल्या बिंदूवर दर्शविणे, काही कर्मचार्‍यांची जात सापडत नसणे, अशा मुद्यांच्या आधारे चौकशी करण्यात आली. सदर चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी प्रशासनातर्फे संजीव भोर यांना सूचित करण्यात आले होते. यावेळी भोर यांनी समक्ष उपस्थित राहून चौकशी समिती अध्यक्षांसमोर खुल्या प्रवर्गावर झालेल्या अन्यायाची पुराव्यासह प्रभावी मांडणी केली. तसेच खुल्या प्रवर्गावरील अन्याय दूर व्हावा, यासाठी योग्य भूमिका घेऊन तटस्थपणे चौकशी न केल्यास हा लढा व्यापक करण्याचा इशाराही दिला होता. 

चौकशी समितीचे अध्यक्ष सुखदेव बनकर यांनीही बाजू ऐकून घेऊन खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याचे मान्य केले. तसेच सदर गंभीर प्रश्‍नी जे सत्य असेल ते शासन दरबारी पोचविण्याचे आश्‍वासन दिले. सदर चौकशी समितीने जिल्हा परिषद अंतर्गत असणार्‍या त्रुटींच्या अनुषंगाने अभ्यास व पडताळणी करून आपला अंतिम अहवाल ग्रामविकास मंत्रालयाला सादर केला. या अहवालानुसार सन  2016 ची बिंदूनामावली सदोष असल्याचे सिद्ध झाले आहे. सन 2016 च्या  बिंदूनामावलीच्या अंतिम मान्यतेनुसार खुल्या प्रवर्गाची सुमारे  194 पदे अतिरिक्त होती. मात्र, सदर तक्रारीनंतर खुल्या प्रवर्गाची  194 पदे अतिरिक्त नसून,  89 पदे रिक्त आहेत, असा निष्कर्ष समितीने अहवालात काढला. याचाच अर्थ असा की, 283 गंभीर स्वरुपाचे आक्षेप मान्य करण्यात आले असून, जि.प मध्ये खुल्या प्रवर्गाच्या प्राथमिक शिक्षकांच्या 283 जागा वाढल्या आहेत. याच पद्धतीने इतरही काही जिल्ह्यांतील रोष्टर तपासणी होत आहे.

सुधारित बिंदूनामावलीस 12 फेब्रुवारी 2018 रोजी सहाय्यक आयुक्त (मावक) नाशिक विभाग यांनी मंजूर दिली आहे. मराठा मागण्या उपसमितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांचीही 2 फेब्रुवारी रोजी संजीव भोर यांनी भेट घेऊन ग्रामविकास सचिवांसमक्ष माहे एप्रिल 2018अखेरचा रिक्त पदांचा अहवाल मागविण्याऐवजी 31 मे 2018 अखेरचा रिक्त पदांचा अहवाल मागवावा, अशी आग्रही लेखी विनंतीही केली होती. ही विनंती मान्य होऊन 27 फेब्रुवारी 2018 रोजीच्या पत्रान्वये मे 2018 अखेरचा रिक्त पदांचा अहवाल कळविण्याचे सर्व जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आले आहे. संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रहार संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खुल्या प्रवर्गातील शिक्षकांचा एक मोठा विषय मार्गी लागला आहे. सदर प्रश्‍नाच्या तपासणीकामी जयदीप मोकाटे, वसंत कुलट, सतीश जपकर, विनोद पवार, संजय लांडगे आदींनी परिश्रम घेतले.