Sat, Nov 17, 2018 01:47



होमपेज › Ahamadnagar › जिल्हा परिषद अनुकंपा भरतीची होणार चौकशी

जिल्हा परिषद अनुकंपा भरतीची होणार चौकशी

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:09AM



नगर : प्रतिनिधी

2016 साली अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेत 25 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या. सेवाजेष्ठता डावलून नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप करत सदस्य सुनील गडाख यांनी विभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे हे या प्रकरणी चौकशी करून स्थायी समितीच्या सभेत अहवाल ठेवतील व हा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनुकंपा भरतीच्या मुद्द्यावरून सुनील गडाख यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांना चांगलेच धारेवर धरले. मागील सभेत गडाख यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या उत्तरावर नापसंती व्यक्त करत गडाखांनी यादवांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सुरुवातीला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार्‍या यादव यांनी नंतर मात्र चुप्पी साधली.

गडाख यांच्या सेवाजेष्ठता डावलल्याच्या आरोपाला यादव यांनी नाकारले. कागदपत्र अपूर्ण असल्याने सेवाजेष्ठता यादीतील पुढील उमेदवारांना नियुक्त्या दिल्याचे यादव म्हणाले. त्यावर कागदपत्र पूर्ण करायचे काम तुमच्या विभागाचे आहे. मग ते पूर्ण का केले नाही? असा प्रतिसवाल गडाख विचारला. 2016 मध्ये एकाच दिवशी 18 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल व रवींद्र बिनावडे यांना अंधारात ठेऊन 286 लोकांवर अन्याय करण्यात आल्याचे ते म्हणाले.

भरती करतांना 10 टक्के जागा ग्रामपंचायतच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णयही पाळण्यात आला नाही. सेवाजेष्ठता डावलत वर्ग 3 मध्ये असलेल्यांना वर्ग 4 मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. अनुकंपा भरती प्रकरणात कागदपत्रात फेरफार केल्यावरून सामान्य प्रशासन विभागातील दोघा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होते. सामान्य प्रशासन विभाग सभागृहाला वारंवार दिशाभूल करत असेल तर आमचे राजीनामे घ्या, असा आक्रमक पवित्रा गडाख यांनी घेतला.

गडाख यांना जालिंदर वाकचौरे, हर्षदा काकडे, राजेश परजणे, राहुल झावरे यांनी पाठिंबा देत कारवाईची मागणी केली. अध्यक्षा विखे यांनी डॉ. अशोक कोल्हे यांना चौकशी करून अहवाल 26 मार्च रोजी होणार्‍या स्थायी समितीच्या सभेत सादर करण्याचे निर्देश दिले. कोल्हे यांनी दिलेला अहवाल विभागीय आयुक्तांना कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. अनुकंपा भरतीबाबत अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. उमेदवार जिल्हा परिषदेत चकरा मारून थकले पण नियुक्त्या मिळत नव्हत्या. आता चौकशी अहवालातून सत्य परिस्थिती बाहेर येणार आहे.