Thu, Jun 27, 2019 16:12होमपेज › Ahamadnagar › झेडपीचे 38 कोटींचे अंदाजपत्रक!

झेडपीचे 38 कोटींचे अंदाजपत्रक!

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:25AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आगामी 2018-19 या आर्थिक वर्षाच्या 38 कोटी 98 लाख 70 हजार 327 रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला पाच लाखांच्या शिलकीसह अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी अंदाजपत्रक सादर केले. मागील वर्षी कृषिपूरक असलेला अर्थसंकल्प यावर्षी बांधकाम विभागास पूरक करण्यात आला आहे. दक्षिण व उत्तर बांधकाम विभाग मिळून 8 कोटी 91 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. सभेस उपाध्यक्षा राजश्री घुले, समिती सभापती अजय फटांगरे, अनुराधा नागवडे, उमेश परहर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे आदी उपस्थित होते.
अंदाजपत्रकात पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागावरही विशेष भर देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची व मोर्‍यांची कामे, हायमॅक्स सौरदिवे, पथदिवे बसविणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास साहित्य पुरवठा करणे, समाजकल्याण विभागांतर्गत विद्यार्थ्यांना सायकल वाटप, पशुपालकांचे अभ्यास दौरे, शाळा खोल्यांची दुरुस्ती , विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल बालआनंद मेळावे साजरा करणे, दफनभूमीसाठी अनुदान अशा विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. शेवगाव पाथर्डी पाणीयोजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2 कोटी 85 लाख तर बुर्‍हाणनगर योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी 65 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

2017-18 चे अंदाजपत्रक 37 कोटी 67 लाख 64 हजार 700 रुपयांचे होते. सुधारित अंदाजपत्रक करतांना त्यात 4 कोटी 75 लाखांची वाढ करण्यात आली. अंदाजपत्रकात जिल्हा परिषद मुख्य कार्यालयातील संगणक देखभाल दुरुस्ती, अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण यासाठी 25 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात लाळ्या खुरकत लसींचा राज्य सरकारकडून वेळेवर पुरवठा न झाल्याने प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात या लसींसाठी 40 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन व अर्थ विभागासाठी तब्बल 9 कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही तरतूद बांधकाम विभागासाठी देण्याची मागणी सदस्य सुनील गडाख यांनी केली.

त्याला राजेश परजणे, हर्षदा काकडे, जालिंदर वाकचौरे आदींसह सदस्यांनी पाठिंबा दिला. गडाख यांनी लेखा व वित्त अधिकारी अनारसे यांना चांगलेच धारेवर धरले होते. 9 कोटींपैकी 4-4 कोटी दक्षिण व उत्तर बांधकाम विभागाला देण्याची मागणी गडाखांनी केली. त्यावर अध्यक्षा विखेंनी बांधकाम विभागासाठी आगामी काळात निधी वाढवून देण्याचे आश्वासन दिले.