Sun, Mar 24, 2019 16:13होमपेज › Ahamadnagar › झेडपीच्या ‘हायमास्ट’ला घोटाळ्याचा ‘वास’

झेडपीच्या ‘हायमास्ट’ला घोटाळ्याचा ‘वास’

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात लावण्यासाठी देण्यात येणार्‍या हायमास्ट दिव्यांच्या प्रक्रियेला घोटाळ्याचा वास येऊ लागला आहे. जवळपास 430 हायमास्टच्या खरेदीसाठी एकत्रित ई-निविदा काढण्याची गरज असतांना 16 पेक्षा जास्त दुकानदारांच्या नावाने स्वतंत्र निविदा काढून दिव्यांची खरेदी करण्यात आली आहे. जास्त खरेदी केल्यास बाजारभावापेक्षा 15 ते 20 हजार रुपयांनी कमी दरात दिवे मिळाले असते. मात्र स्वतंत्र निविदा काढत दिव्यांच्या किमती वाढविल्याचा आरोप होऊ लागला आहे.

दोन वर्षांपूर्वीचा कपाट खरेदी घोटाळा अजून चौकशीच्या फेर्‍यात अडकला असतांना आता हायमास्ट खरेदीत अनियमितता होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कपाट खरेदी घोटाळ्यात ज्या प्रकारे कपाट खरेदीचे केंद्रीकरण करण्यात आले होते, तसेच केंद्रीकरण हायमास्ट प्रकरणात होत असल्याचे समोर आले आहे. अंदाजे 2 कोटी रुपयांहून अधिक हायमास्ट दिव्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. 16 पेक्षा जास्त ठेकेदारांनी वेगवेगळ्या दुकानांच्या नावावर निविदा भरल्या असल्या तरी, यामागे ठराविक 4 ते 5 ठेकेदार असल्याचा संशय आहे. निविदा पद्धतीचा वापर करून बाजारभावापेक्षा जास्त दराने हायमास्ट दिवे बसविल्याचे पुढे येत आहे. दक्षिण जिल्ह्यासाठी 203 तर उत्तर जिल्ह्यासाठी 121 पेक्षा जास्त हायमस्टची खरेदी करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणावर खरेदी असल्यास खरेदीचे केंद्रीकरण करण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झालेले नाही. कपाट खरेदी घोटाळ्यात अंगणवाड्यांना एका कपाटासाठी पाच हजार रुपये देण्यात आले होते. अंगणवाडी सेविकेने कपाट खरेदी करावे, असा आदेश होता. परंतु तसे न करता पुरवठादाराचे नाव देवून त्यांच्याकडून खरेदी करण्याचे सांगण्यात आले. त्यातून निकृष्ट कपाट खरेदी झाल्याचे समोर आले. त्या खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल मंत्रालयात कारवाईसाठी प्रलंबित आहे.

तशीच काहीशी पद्धत आता जिल्हा परिषदेत हायमास्ट खरेदी करतांना पद्धत वापरण्यात आली आहे. हायमास्ट खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सेसमधून दोन कोटी रुपये निधी खरेदीसाठी देण्यात आले होते. 430 पेक्षा जास्त हायमास्ट खरेदीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली. हायमास्ट दिवे खरेदी करण्यासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असती, तर निविदा धारकांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन कमी दरात दिवे मिळाले असते.बाजारभावाप्रमाणे तसेच ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर हायमास्टची किंमत 35 ते 40 हजार रुपये असल्याचे दिसते. या खरेदी केलेल्या हायमास्टची किंमत 60 ते 65 हजार रुपये दाखविली असल्याचे समजते. इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेल्या हायमस्टची किंमत जास्त असूनही त्याला अधिकारी व पदाधिकार्‍यांनी आक्षेप घेतला नसल्याने या प्रकरणामागील गूढ वाढत आहे.

खासदाराचे ‘पत्र’, पदाधिकार्‍यांचा ‘दबाव’

जिल्ह्यात एका तालुक्यातील हायमास्ट बसविण्याचे काम एका ठराविक ठेकेदारालाच मिळावे यासाठी जिल्ह्यातल्या एका खासदाराने जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र पाठविले. या पत्रात त्या ठेकेदाराची शिफारस करण्यात आल्याचे समजते. तसेच एका ठेकेदाराचे रखडलेले बिल काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या एका समिती सभेत एका पदाधिकार्‍याने विषय उपस्थित केल्याचीही माहिती आता समोर येत असल्याने खासदार व पदाधिकार्‍यांना ठेकेदाराला ‘इंटरेस्ट’ का? असा सवाल उपस्थित होत आहे.

या दुकानदारांकडून घेतले हायमास्ट

हायमास्ट दिव्यांचे कोटेशन मागवून खरेदी करण्यात आली त्यासाठी लक्ष्मीप्रसाद इलेक्ट्रिकल्स (मालक - नितीन हिरालाल शहा), ए. बी. इलेक्ट्रिकल्स (मालक - आरडे, पूर्ण नाव नाही), धनकमल इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअर्स, अष्टविनायक इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, संचित इलेक्ट्रिकल्स, पूजा इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअर्स, जय मुंजोबा लाईट हाऊस, सदानंद मजूर सहकारी संस्था, यासह काही दुकानांचा समावेश आहे. यातील बहुतांश दुकानदार हे पारनेर तालुक्यातील असल्याचे समजते.