होमपेज › Ahamadnagar › झेडपी अधिकार्‍यांवर बदल्यांची टांगती तलवार

झेडपी अधिकार्‍यांवर बदल्यांची टांगती तलवार

Published On: Feb 12 2019 1:04AM | Last Updated: Feb 12 2019 12:30AM
नगर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात गेल्या तीन-चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी सेवा तपशील विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील प्रमुख अशा चार व 7 गटविकास अधिकारी अशा अकरा जणांवर बदल्यांची टांगती तलवार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगूल पुढील महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. या निवडणूक प्रक्रियेत महसूल व पोलिस अधिकारी हे राजकीय नेते वा पक्ष यांच्या आहारी जावू नयेत, यासाठी जिल्ह्यातील रहिवास आणि सलगपणे तीन वर्षे जिल्ह्यात सेवा करणार्‍या जिल्हाबाहेरील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागातील अधिकार्‍यांचाही बदल्या होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने स्व जिल्हा, एका पदावर तीन वर्षे सेवा पूर्ण, जिल्ह्यातील चार वर्षे सेवा व गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काम केले आहे किंवा नाही, अशा चार मुद्यांवर प्रत्येक अधिकार्‍याची माहिती पाठविली आहे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर हे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर उर्वरित तीन अधिकार्‍यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ जिल्ह्यात पूर्ण केला आहे. काही गटविकास अधिकारी हे जिल्ह्यातील असून, काही जणांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 15-20 दिवसात आचारसंहिता लागू शकते. त्यापूर्वीच या अधिकार्‍यांच्या बदल्या होऊ शकतात.

यांच्या होणार बदल्या...

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, रोहयोच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांच्यासह राहुरीचे बीडीओ गोविंद खामकर, राहात्याचे बीडीओ समर्थ शेवाळे, संगमनेरचे बीडीओ सुरेश शिंदे, नेवाशाचे बीडीओ शेखर शेलार, नगरच्या बीडीओ अलका शिरसाठ तसेच शेवगावचे बीडीओ अशोक भवारी व पाथर्डीच्या गटविकास अधिकार्‍यांचा समावेश आहे.

रिक्त जागांसाठी अनेकांची ‘फिल्डिंग’

चार उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह 7 गटविकास अधिकार्‍यांची बदली झाल्यास त्यांच्या येथील जागा रिक्त होणार आहेत. या रिक्त जागांसाठी वरिष्ठ पातळीवर अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काम करणे सोपे असल्याचा (गैर) समज असल्याने नगरला ‘पोस्टिंग’ मिळावी यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कुठल्या अधिकार्‍याची कुठल्या पदावर वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे.