Wed, Sep 26, 2018 13:00



होमपेज › Ahamadnagar › गुणवत्ता नियंत्रकांकडून झेडपी कामांची तपासणी

गुणवत्ता नियंत्रकांकडून झेडपी कामांची तपासणी

Published On: Mar 12 2018 1:03AM | Last Updated: Mar 11 2018 10:52PM



नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेमार्फत होणार्‍या सर्व कामांची तपासणी आता राज्य गुणवत्ता नियंत्रकांकडून  होणार आहे. त्यासाठी राज्य गुणवत्ता समन्वयक महाराष्ट्र राज्य यांच्या पॅनलवरील 17 नियंत्रकाची नियुक्ती करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी काढला आहे. 

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येतात. त्यासाठी जिल्हा परिषदेसह शासनाच्या विविध योजनांद्वारे निधी देण्यात येत असतो. ही कामे करतांना अनेकदा कामांचा दर्जा योग्य पद्धतीने राखलेला नसतो. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कामाचा निकृष्ठ दर्जा दिसून येतो. अनेकदा काम पूर्ण होत असतांनाच संबंधित ठेकेदाराला कामाचे बिल अदा झालेले असते.

त्यामुळे काम पूर्ण झाल्यावर निकृष्ठ दर्जाचे असल्याचे सिद्ध झाल्यावरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यासाठी आता सर्व कामांची तपासणी झाल्यानंतरच बिले अदा करण्यात येणार आहेत. 14 तालुक्यांसाठी 14 अधिकारी नेमण्यात आले असून, तीन अधिकारी हे जिल्हास्तरावर राखीव असणार आहेत. नियुक्त करण्यात आलेले बहुतांश अधिकारी हे नगर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. 

याबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 2012 साली शासन निर्णय घेतला होता. जिल्ह्यात दक्षिण व उत्तर असे दोन उपविभाग आहेत. गुणवत्ता नियंत्रकांमार्फत अंतर्गत रस्ते व पूल दुरुस्ती आणि परिरक्षण कामे तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी सर्व प्रकारची कामे यांची तपासणी करण्यात येणार आहे. नियुक्त अधिकार्‍यांमध्ये सेवानिवृत्त अभियंता, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता, खाजगी क्षेत्रातील सल्लागार आदींचा समावेश आहे.