होमपेज › Ahamadnagar › स्वयंपाक खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण

स्वयंपाक खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:27PMदेवदैठण : प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील मेखणी वस्तीवरील जि. प. शाळेतील विद्यार्थी शाळेच्या धोकादायक इमारतीमुळे चक्क स्वयंपाक खोलीत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे नुकत्याच वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात सुसाट वार्‍याने या शाळेवरील सर्व पत्रे उडून गेले. वादळाच्या तडाख्याने शाळेची मागील भिंत पडली आहे. इतर भिंतींनाही चोहोबाजूंनी तडे गेले आहेत. संपूर्ण इमारतच धोकादायक बनली आहे. आतापर्यंत दोनदा ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेची  डागडुजीही केली आहे. आ. राहुल जगताप, पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे आदींनी शाळेला भेट देऊन पाहणीही केली.

ग्रामस्थांनी शासनाकडून शाळेसाठी नविन इमारतीची मागणी केली आहे. 15 जूनला शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वस्तीवरील भास्कर वाघमारे यांच्या राहात्या घरातील एका खोलीत तिसरी व चौथीची मुले शिक्षण घेत आहेत. जेथे मुलांचा आहार शिजवला जातो त्या शाळेच्या स्वयंपाक खोलीत (किचन शेड) पहिली व दुसरीची चिमुरडी धडे गिरवताना दिसत आहेत. शासनाची मदत मिळेल तेव्हा नवीन इमारत होईल. मात्र सध्या तरी मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा एकत्र येऊन सढळ हाताने मदत करत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.