Thu, Jun 27, 2019 13:59होमपेज › Ahamadnagar › झेडपी सीईओंची ‘सरप्राईज व्हिजिट’!

झेडपी सीईओंची ‘सरप्राईज व्हिजिट’!

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 08 2018 11:53PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्रशासनावर मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप मागील आठवड्यात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी केला होता. त्यामुळे माने यांची प्रशासनावरील पकड ढिली तर झाली नाही ना? अशी शंका उपस्थित होत होती. यानंतर ‘अ‍ॅक्टिव्ह’ झालेल्या माने यांनी लघु पाटबंधारे विभागात ‘सरप्राईज व्हिजिट’ देत प्रलंबित कामांचा आढावा घेतला.जिल्हा परिषदेत आल्यानंतर अधिकार्‍यांना कामासंदर्भात बोलावले असता, अधिकारीच उपलब्द्ध नसतात. कुठल्याही प्रकारची कामे होत नाहीत. नागरिकांची कामे होत नाहीत. अधिकार्‍यांना विचारणा केली असता व्हिडीओ कॉन्फरसिंग असल्याचा बहाणा सांगण्यात येतो. खालच्या अधिकार्‍यांवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप अध्यक्षा शालिनी विखे यांनी केला होता. या आरोपाची गंभीर दाखल माने यांनी घेतल्याचे दिसते. 

आठवड्यात सोमवारी व मंगळवारी अधिकार्‍यांनी कार्यालयात हजर राहिलेच पाहिजे. बाहेर जायचे असल्यास अध्यक्ष कार्यालयाला लेखी कळवायला हवे. मात्र असे होत नाही. नागरिक कामासाठी हेलपाटे मारत असतांना अधिकारी मात्र व्हीसीचे कारण देत दिवसदिवस गायब असतात. मंत्रालयातील अधिकार्‍यांनी आठवड्यातील एक - दोन दिवस ‘व्हीसी’साठी राखून ठेवले पाहिजेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले. पण त्यावरही कारवाई झालेली नाही, अशी विखे यांची तक्रार होती.त्यानंतर माने यांनी नुकतेच कामाच्या वेळेत हजर नसणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांची बिनपगारी केली होती. शिक्षण विभागात अचानक भेट देत चांगलीच झाडाझडती घेण्यात आली होती. त्यानंतर काल (दि. 8) लघुपाटबंधारे विभागात सीईओ माने यांनी अचानक भेट देत पाहणी केली.

जलयुक्तच्या कामांना गती देण्याचे आदेश

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. 2016-17 सालच्या कामांना जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत आहे. त्यामुळे माने यांनी प्रलंबित असलेल्या कामाच्या प्रशासकीय त्रुटींची माहिती घेतली. अधिकारी, कर्मचार्‍यांना या त्रुटी पूर्ण करून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.तसेच 2017-18 च्या कामांनाही उशीर न करता लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यास सांगितले.