Sat, Nov 17, 2018 10:01होमपेज › Ahamadnagar › अनैतिक संबंधातून तरुणाचा खून  

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून  

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:47AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

अनैतिक संबंधाला विरोध करणार्‍या पतीचा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विकास पवार (35, रा. पढेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आण्णासाहेब पवार (39) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल तोरणे (39) व मयताची पत्नी मनिषा विकास पवार (दोघे रा. पढेगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास पवार हा आपल्या पत्नीसमवेत गेल्या काही वर्षांपासून पढेगाव येथे वास्तव्यास होता. त्याच्या पत्नीचे आरोपी विशाल तोरणे याच्याशी अनैतिक संबंध होते. या गोष्टीला विकास याचा विरोध होता. त्यामुळे आरोपी विशाल तसेच मनिषा या दोघांनी संगनमताने त्याचा खून केल्याचे पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

सदरची घटना उघडकीस आल्यानंतर तालुका पोलिस निरीक्षक संपतराव पथवे, हेड कॉन्स्टेबल घाणे, बढे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे नेण्यात आला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते. 

मयत विकास पवार हा कुकाणा येथे कामाला होता. त्याच्या घरी त्याची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातेवाईक राहतात. तो नुकताच यात्रेनिमित्त पढेगावला आला होता. दरम्यान, त्याच रात्री त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी विशाल तोरणे यास ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक वसंतराव पथवे करीत आहे. 

 

Tags : Shrirampur, Shrirampur news, crime, murder,