होमपेज › Ahamadnagar › नागरदेवळे ग्रामसभेत तरुणांची हाणामारी

नागरदेवळे ग्रामसभेत तरुणांची हाणामारी

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:47AMनगर : प्रतिनिधी 

नागरदेवळे (ता. नगर) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत काही तरुणांनी धक्काबुक्की केली. हा वाद वाढल्याने अखेर पोलिसांना बोलवावे लागले. पोलिसांनी जमलेल्या जमावाला पांगविले. या प्रकारामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली. धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे काळ गावात तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागरदेवळे ग्रामपंचायतीतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ध्वजवंदन झाले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर काही तरुण ग्रामसभेत आले. त्यांनी आमच्या मेंबरच्या विरोधात तक्रार करतो का, असे म्हणत निखिल शेलार यांना धक्काबुक्की करण्यास प्रारंभ केला. त्यांना उपस्थितांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीन नव्हते.

त्यांनी तेथे गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. उपस्थितांनी शेलार यांना ग्रामसभेपासून दूर नेले. मात्र तेथेही या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे तेथे मोठा जमाव जमला होता. वाद वाढल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिस आल्यानंतर त्यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा जमाव पांगला. या घटनेमुळे गावात काही काळ वातावरण तणावपूर्ण होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून गेले. तसेच पालकांनीही आपल्या पाल्याला तेथून नेण्यासाठी शाळेकडे धाव घेतली. तसेच महिला सदस्याही घाबरून गेल्या होत्या. ग्रामसभेत झालेला हा प्रकार पाहून सरपंचांनी ग्रामसभा तहकूब केली.  दरम्यान, सत्ताधार्‍यांना गावातील समस्या सोडविण्यात अपयश आले आहे.

त्यामुळे ग्रामसभेत त्याबाबत जनता जाब विचारील, या भीतीपोटी सत्ताधार्‍यांनीच हा प्रकार घडवून आणला. हा प्रकार पूर्वनियोजित असल्यानेच उपसरपंच व सत्ताधारी गटातील काही ग्रामपंचायत सदस्य  अनुपस्थित होते, असेही विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप केला. याप्रकरणी आसीफ आयुब पठाण, चांद शेख (पूर्ण नाव समजले नाही), बालाजी शिवाजी चौधरी, शिवाजी तुळशिराम चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.