Wed, Jun 26, 2019 23:39होमपेज › Ahamadnagar › शिवसेना येत्या वर्षात सत्तेला लाथ मारणार!

शिवसेना येत्या वर्षात सत्तेला लाथ मारणार!

Published On: Dec 15 2017 2:42AM | Last Updated: Dec 14 2017 11:10PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील वाढती महागाई, पदवीधरांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न आजही कायम आहे. नोटबंदी अपयशी ठरलीय. व्यापारी, शेतकरी, महिला वर्ग सर्वच क्षेत्रात नाराजीचे वातावरण असल्याच्या शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाना साधला. शिवसेना सत्तेत पहारेकर्‍यांच्या भूमिकेत आहे. त्यामुळे येत्या वर्षात कधीही सत्तेला लाथ मारू. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकर हेच याबाबत अंतिम निर्णय घेतील असे सांगताना ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वर टीका करण्याचे मात्र त्यांनी टाळले.

नगर येथील शिवसेनेच्या सभेत ते बोलत होते. गुजरातच्या सभेसारख्या आपल्या खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपाला टोला लगावला.

 ते म्हणाले की, राज्यातील शिक्षण पद्धती, डोनेशनचा प्रश्‍न, भरमसाठ फीचा प्रश्‍न मोठा आहे. एवढे करूनही शिक्षणानंतर तरुणांना नोकरी मिळत नाही. नोटाबंदी अपयशी ठरली. त्यानंतर एकही श्रीमंत रस्त्यावर आलेला दिसला नाही. महिलांनी बचत केलेले पैसे काळं धन म्हणून दाखविले गेले. सर्वसामान्यांनाच याचा फटका बसला. शिक्षक, तरुण, व्यापारी, महिला, शेतकरी सर्वांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गॅस अनुदान बंद केले गेले. या निर्णयामुळे 3 कोटी महिलांना फायदा झाल्याची जाहिरातबाजी केली गेली. या महिला आहेत कुठे? कोण आहेत? याबाबत आम्ही विधीमंडळातही माहिती मागविली. मात्र, फायदा झालेल्या महिला शोधूनही सापडत नाहीत. विरोधी पक्षात असतांना 400 रुपयांचा सिलेंडर महाग झाला की आंदोलन करायचो. निवडणुकीत  महागाईवरून फलक लागले. ‘अब की बार..’  म्हणत आश्‍वासनांची उधळपट्टी झाली. मात्र, ती आश्‍वासने फलकांवरच राहिल्याची टीका त्यांनी केली.

शेतकर्‍यांना कर्जमुक्‍ती हवी आहे. एखाद्याने पाप केले तरी आपण त्यांना पापातून मुक्‍ती देतो. इथे मात्र अजूनही शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळत नाही. जे चांगले आहे, त्याचे स्वागत करू. मात्र, जे चुकीचे आहे, त्याला आम्ही चूकच म्हणणार. अशा स्थितीत येत्या वर्षात शिवसेना सत्तेला लाथही मारेल, उध्दव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे म्हणत आगामी काळात सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. 

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भाजपावर निशाना साधताना आदित्य ठाकरे यांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’बाबत चकार शब्दही काढला नाही. सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देऊन भाजपला ‘टार्गेट’ करताना ठाकरे यांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वर टीका करणे टाळल्यामुळे येत्या वर्षभरातील घडामोडींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.