Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Ahamadnagar › अवघे नगर शहर बनले योगमय..!

अवघे नगर शहर बनले योगमय..!

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 10:44PMनगर : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काल (दि.21) संपूर्ण नगर शहर योगमय बनले होते. शासकीय-सामाजिक संस्थांसह शहरातील शाळा, महाविद्यालये, तरूण मंडळे, महिला मंडळांसह नागरिकांनी ठिकठिकाणी झालेल्या सामूहिक योगाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.   

वाडिया पार्कमध्ये सामूहिक योगा

वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मैदानात झालेल्या सामूहिक योग कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी वामन कदम, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, क्रीडा अधिकारी उदय जोशी आदींसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत योगासने केली. 

पोलिसांनी केली मुख्यालयात योगासने

पोलिस दलाच्या वतीने आंतराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम पोलिस मुख्यालयात उत्साहात पार पडला. नेहमीच तणावपूर्ण कामात व्यस्त असलेले पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी योग शिबिरात सहभागी होऊन विविध आसने केली. त्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हा कारागृहात बंदीवानांची आसने

जिल्हा कारागृहातही आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त बंदिवानांनी योगासने केली. यावेळी कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे, रेखा जरे, डॉ.संजय खंडागळे आदींसह कारागृहाचे कर्मचारी व बंदिवान उपस्थित होते. रत्नाकर जोशी यांनी प्राणायामबद्दल शास्त्रीय माहिती दिली. डॉ.सुधा कांकरिया यांनी मेडिटेशनबद्दल (ध्यान) मार्गदर्शन केले. चायना येथे योग शिक्षक म्हणून कार्यरत असलेला आंतराष्ट्रीय योग शिक्षक रुणाल जरे पाटील याने बंदिवानांना योगाचे धडे दिले.

योग विद्याधामचा योग महोत्सव

नगर अर्बन बँक व योग विद्या धामच्यावतीने गुलमोहोर रस्त्यावरील आनंद विद्यालय येथे योग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खा.दिलीप गांधी यांच्यासह मोहन मानधना, दीपक गांधी, डॉ.सुंदर गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, योग साधक, अर्बन बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. योग विद्या धामच्यावतीने यावेळी सर्वांना शास्त्रोक्त योगासनाचे धडे देण्यात आले. लिटिल चॅम्प फेम नंदिनी गायकवाड हिने यावेळी योगगीत सादर केले. 

कॅन्टोन्मेंट कार्यालयावर विद्युत रोषणाई

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भिंगार कॅन्टोन्मेंट कार्यालय व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालय उजळून निघाले असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आयुष मंत्रालयाच्या आदेशान्वये देशातील सर्व कॅन्टोन्मेंट कार्यालयांना विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली असून, योग दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. श्रीवास्तव व कार्यालयीन अधीक्षक एस.एस. शिरकुळ यांनी दिली.