Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Ahamadnagar › व्यक्त मी..‘अव्यक्त’ मी !!

व्यक्त मी..‘अव्यक्त’ मी !!

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 10:43PMराजकारणावर बोलू काही..

‘काही बोलायचे आहे पण; बोलणार नाही। देवाचिये द्वारी भक्ती तोलणार नाही’ असं यशवंतरावांच्या स्वभावाचं अजब मिश्रण आहे.‘ दिल है छोटासा.. छोटीसी आशा । मस्तीभरी मन की भोलीसी आशा..चाँद तारोंको छुने की आशा..आसमानों में उडने की आशा...! या ओळीच खरं तरं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ वर्णन करू शकतील..! स्पष्ट बोलणं आणि कोणाला दुखावणं हा त्यांचा स्वभावधर्म नसला तरी राजकारणातील ‘वास्तव’ त्यांनी  आता सांगायला हवं.. आणखी व्यक्त व्हायलाच हवं..राजकारणातल्या या बेरकी रसायनाचा ‘केमिकल लोचा’ कसा होतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलाय. तो त्यांनी युवामनांशी ‘शेअर’ करायलाच हवा. नाही का? चला तर मग गडाख साहेब आता..‘ राजकारणावर बोलू काही...!’

-अनिरूध्द देवचक्के

‘राजकारण’ हे एक अजब रसायन आहे. त्याची विशेष अशी कोणती चव नाही. कधी ते आंबट असतं तर कधी गोड.. कधी खारट, कधी तुरट. कधी ते तिखट असतं तर कधी कडू.आणि कधी कधी तर ते चक्क ‘बेचव’ सुध्दा असतं..! अशा विविध प्रकारच्या चवींचं मिश्रण असलेलं हे अजब रसायन, म्हणूनच कळायला तसं अवघडच..! पण, एकदा का हे रसायन नसानसात भिनलं की त्याचे परिणाम भल्याभल्यांनाही गुंगवून टाकतात. राजकारणात योग्य वेळेला केलेली योग्य कृती, त्या त्या वेळच्या या रसायनाची चव ठरवित असते.आणि ही चव नेमकी कशी आहे हे समोरच्याला कळू न देता, ती ‘गोड’च आहे, असं भासवणं हे असतं कौशल्य. ही कला ज्या राजकीय व्यक्तीच्या अंगी बाणावली जाते, त्या व्यक्तीला ‘बेरकी’ म्हणून संबोधलं जातं.. आणि यशही लोळण घेतं ते त्याच्याच पायाशी. राजकारणात साध्या, सरळ, संवेदनशील व्यक्तीचा निभाव कधी लागत असतो थोडीच..! 

उठसूट ‘नोकर्‍या सोडा.. व्यवसाय करा’,‘नोकर्‍या मागणारे नको..नोकर्‍या देणारे व्हा!’ असे सल्ले देणारे कधी ‘राजकारणात’ या असं सांगत नाहीत.. त्याचंही कारण हेच आहे. नाकासमोर पाहून चालणारे.. ‘आपण बरं आपलं घरं बरं’ या सिध्दांतावर विश्‍वास असलेले आणि परिस्थितीने गंजून, पिचून गेलेले हा सल्ला कधी मानूच शकत नाही.आणि दुसरं कारण म्हणजे अजूनही राजकारण हा ‘उघडपणे’ व्यवसाय झालेला नाही.त्यामुळे उद्या कोणी सक्रीय राजकारणात यायचं आमंत्रण दिलच तर..‘राजकारण नको रे बाप्पा..!’‘राजकारण म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या थापण्यासारखं झालं’, असं म्हणत सर्वसामान्य माणूस त्यापासून दूर पळतो. राजकारण्यांना नांव ठेवतो.त्यांच्या नावाने अखंड बोटं मोडत राहतो. पण तरीही आजही समाजात असा एक वर्ग आहे की,ज्याला राजकारणात यशस्वी करियर करण्याची इच्छा आहे.. का बरं? 

कारण,शेवटी राजकारण हाच समाजजीवनाचा एकमेव असा भाग आहे की ज्यामध्ये समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे, प्रगतीकडे झेपावण्याची शक्ती आहे आणि माणसाला सुखी-समृद्ध करण्याचं बळ आहे. आणि त्यासाठी तरी का होईना आजचा युवक असा विचार करत असेल, तर ती बाब निश्‍चितच स्वागतार्ह म्हणायला हवी..! पण; इथेही अडचण एकच.. राजकारण करायचं तरी कसं? हे सांगणारं कोणीच नाही..! आणि कोण कशाला ते सांगायच्या भानगडीत पडेल..! राजकारण हे स्वत: जगायचं असतं, अनुभवातून फुलवायचं असतं.. समाजकारणाच्या कडेकडेनं त्याला घेऊन जायचं असतं..स्वप्न पहायचं आणि त्याच्या पूर्ततेसाठी सर्वांना बरोबर घेऊन झटायचं असतं.. स्वप्नांची पूर्ती झाली की त्यात समाधान शोधायचं आणि पुन्हा एकदा झेप घ्यायची नव्या स्वप्नाच्या दिशेने.. हेच असतं राजकारण..! त्याची चव आपल्याला हवी तशी ठरविता आली पाहिजे.. एखादा खडा लागला तर तो अलगद बाजूला काढून टाकताही आला पाहिजे..हीच खरी कला आणि तेच तुमचं कौशल्य..! 

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या तब्बल 50 वर्षांच्या सुसंस्कृत राजकीय जीवनाकडे पाहिलं तर या काही बाबी प्रकर्षाने नजरेत भरतील. यशवंतराव गडाख यांचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू उलगडले जाताहेत आणि त्यातला प्रत्येक पैलू हा अनुभवांच्या मैलाचा दगड म्हणून मनात घर करून राहतोय, हेच त्यांचं वैशिष्ठ्य म्हणता येईल. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेली, शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केलेली व्यक्ती ‘पंचायत राज’ व्यवस्थेच्या माध्यमातून राजकारणात येते काय आणि सर्व क्षेत्र व्यापून टाकते काय.. सारेच अदभूत.. अवर्णनीय..! पन्नास वर्षांपूर्वी यशवंतराव गडाख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विकास आणि प्रगतीचं स्वप्न पाहिलं नसतं तर आज काय परिस्थिती असती, याचा विचारही करवत नाही.

सोनई, नेवासा परिसर फिरून पाहिला की तिथे असलेला साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, बँका नजरेत भरतात. तिथलं बदललेलं अर्थकारण लक्षात येतं. त्या भागातली समृद्धी सहज लक्षात येते..आणि मग विचार येतो की यशवंतरावांनी आपली शिक्षकी नोकरी तशीच चालू ठेवली असती तर..! या सार्‍या गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणणं सोप काम नाही. अर्थात हे सगळं साकारत असताना काय काय करावं लागलं याचा उहापोह गडाखांनी आपल्या‘अर्धविराम’,‘सहवास’ या पुस्तकातून केलेला आहेच. वेगळ्या वाटेनं या त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातूनही त्यावर प्रकाशझोत पडतो. यशवंतराव गडाखांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे? त्याची जडणघडण नेमकी कशी झाली? आलेल्या संकटांवर त्यांनी मात कशी केली हे सगळं आज समजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेलं आहेच.. पण तरीही ‘व्यक्त मी.. अव्यक्त मी..!’ अशीच त्यांच्या मनाची अवस्था असल्याचं जाणवतं आहे..असंं का बरं?

यशवंतराव गडाख हे महाराष्ट्रातलं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या तोडीचं नेतृत्व..! त्यांच्या संसंस्कृत राजकारणाचा नगरी ब्रँड राज्यातच नव्हे तर देशात स्थापित होण्याची गरज आहे. गडाखांनी राजकारण केलं पण, काही तडजोडी केल्या नाहीत. त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. जिल्हा परिषदेचं दहा वर्ष अध्यक्षपद, खासदारकी आणि विधानपरिषदेचे सदस्यत्व या पलिकडे जाण्याची क्षमता असतानाही त्यांना तिथपर्यंत पोहोचू दिलेलं नाही. विखे-गडाख खटल्यानंतर त्यांना 6 वर्ष निवडणूक लढविण्यापासून अपात्र ठरविण्यात आल्यानंतर गडाख साहित्याकडे वळाले. लिहिता लिहिता व्यक्त व्हायला लागले. याच काळात त्यांचा राजकारणाकडे पहायचा दृष्टीकोनही व्यापक होत गेला.

म्हणूनच गडाखांच्या नेतृत्वाखाली तेंव्हा जिल्ह्यात विशेषत: दक्षिणेत ‘सहमती’च्या राजकारणाची लाट आली होती. याच तत्त्वावर जिल्हा बँकेचा कारभार चालल्याने आज ही संस्था निदान आर्थिकदृष्ट्या बदनाम तरी झालेली नाही. पण पुढे काळाच्या ओघात ही सहमती कुठल्याकुठे गायब झाली. आणि आजच्या राजकारणाचं चित्र पाहिलं तर अशा पद्धतीच्या सिध्दांतावर काहीच चालू शकत नाही, हे कळून चुकेल..! या एकूण परिस्थितीवर गडाखांनी फारसं कुठेही भाष्य केलेलं नाही. 70 टक्के समाजकारण आणि 30 टक्के राजकारण हा त्यांच्या कामाचा ढाचा असला तरी शेवटी 30 टक्के राजकारणावरच 70 टक्के समाजकारणाचा भार पेलवला गेला हेही वास्तव आहे. मग हे 30 टक्के राजकारण गडाख साहेबांनी कसं केलं? हेही आजच्या राजकारणात येऊ इच्छिणार्‍या युवकांपुढे यायला हवंय.  राजकारणातल्या वेगवेगळ्या चवींचं रसायन त्यांनी कसं चाखलं आणि त्यातून समाजाला ‘अमृत’ कसं मिळवून दिलं? हे नको का कळायला..

पंचायत समितीचे सभापती होऊन तालुक्याच्या धावपट्टीवर ते खेळले आणि नंतर जिल्हा परिषदेत अध्यक्ष झाले. तब्बल दहा वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं.हे कसं काय शक्य झालं? त्यासाठी कोणत्या अ‍ॅडजेस्टमेन्ट्स कराव्या लागल्या, त्या काळात झेडपी सदस्य, अधिकारी ‘सांभाळावे’ लागत नव्हते का? ते त्यांनी कसे सांभाळले? केंद्र आणि राज्यांच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत त्यांनी कशी केली? तत्कालिन पालकमंत्र्यांना त्यांनी कसं काय सांभाळलं? (सध्या भाजपाच्या पालकमंत्र्यांवर जिल्हा परिषद नाराज आहे, म्हणून आठवलं..!) खासदार झाल्यानंतर दिल्ली कशी काय मॅनेज केली असेल? राजीव गांधी, शरद पवार यांच्यासाख्या नेत्यांसमवेत कसं जुळवून घेतलं असेल? काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत कसे गेले आणि पुन्हा शरद पवारांची साथ कशी काय सोडली? (नगर जिल्ह्यात असूनही शरद पवारांनी शुक्रवारी अमृत महोत्सवात हजेरी लावली नाही.. थोडं खटकलं म्हणून..!) पोटनिवडणुकीत शरद पवारांनी ‘तुकाराम गडाखांना’ राष्ट्रवादीत घेऊन चक्क दक्षिणेचं खासदार केलं.

हा आघात त्यांनी कसा काय पचवला असेल? काँग्रेसमध्ये राहून ‘कृतीशील विचार मंच (अ‍ॅक्शन फोरम)’ कार्यप्रवण करून राजीव गांधींच्या नाराजीचे धनी ठरलेल्या स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात एकजूट करून राजकारण करताना त्यांना काय अनुभव आले असतील? विखे पाटलांचा खटला लढवीत असताना, स्वत:पेक्षाही शरद पवारांवर ठपका नको म्हणून अस्वस्थ झालेले गडाख राजकारणात राहूनही इतके भावनाविवश का बरं झाले असतील? आणि त्यानंतरही विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळविताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. असं का बरं? असे एक ना अनेक प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहेत आणि त्याचा उडगडा करू शकतील ते फक्त आणि फक्त यशवंतराव गडाखच..!