Fri, Jun 05, 2020 21:56होमपेज › Ahamadnagar › यशवंत प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

यशवंत प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Published On: Jan 12 2019 1:29AM | Last Updated: Jan 11 2019 11:53PM
नगर : प्रतिनिधी

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे देण्यात दरवर्षी देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार यावर्षी डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, ज्येेष्ठ पत्रकार खा.कुमार केतकर व सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाले आहेत. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी ही माहिती दिली.

नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात 20 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख हे या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. डॉ.रवींद्र व स्मिता कोल्हे हे सामाजिक कार्यकर्ते असून, मेळघाटमधील आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य यासह अनेक सामाजिक कामात त्यांचे मोठे योगदान आहे. कुमार केतकर हे ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांनी अनेक वर्तमानपत्राची जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळली आहे. ते सध्या राज्यसभेवर खासदार असून, अभ्यासू व प्रभावी वक्ते आहेत. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी, तेलगू, तामिळी, कन्नड, मल्याळम चित्रपटांत काम केले आहे. महाराष्ट्र राज्यात वृक्षलागवडीसाठी त्यांच्या हातून मोठे कार्य होत आहे. यशाच्या शिखरावर असतांनाही ग्रामीण संस्कृतीशी असणारी आपली नाळ त्यांनी आजही जोडून ठेवली आहे.

यशवंत प्रतिष्ठानने यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, नसीमा हुरजूक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आमटे, डॉ. तात्याराव लहाने, सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, सदानंद मोरे यांना या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शंकरराव गडाख यांनी केले आहे.