Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Ahamadnagar › कामचुकार ‘बीएलओं’ची होणार आता झाडाझडती

कामचुकार ‘बीएलओं’ची होणार आता झाडाझडती

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील कामचुकार मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांच्या आजपर्यतच्या निवडणूक कामांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी हे स्वत: तपासणी करणार आहेत. या झाडाझडती मोहिमेस आजपासून प्रारंभ होणार आहे. दप्‍तर तपासणीत असमाधानकारक काम आढळणार्‍या बीएलओंवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बीएलओंचे धाबे दणाणले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी बिनचूक असावी ,यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषत केला जात आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून केली जाते. यासासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्‍त केला जातो. जिल्हाभरात आजमितीस 3 हजार 599 बीएलओ कार्यरत आहेत. निवडणूक आयोगाला बिनचूक मतदार यादी हवी आहे. परंतु पाच ते दहा टक्के बीएलओ निवडणूक कामात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करणे व निवडणूक विषयक कामे सुरु आहेत. त्यानुसार बीएलओंनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाची दप्‍तर तपासणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर करणार आहेत. या तपासणीत त्यांच्या सर्व नोंद वहया, केलेली मतदार नोंदणी, मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची केलेली वगळणी, आजपर्यंत वाटप केलेले निवडणूक मतदार छायाचित्र  ओळखपत्र (एपिक), मतदारांचे जमा केलेले फोटो तसेच कृष्ण धवल फोटो असलेल्या मतदारांचे जमा केलेले रंगीत फोटो आदी कामांचा तपासणीत समावेश केलेला आहे.

दीडशे बीएलओ रडारावर

हलगर्जीपणा व टाळाटाळ करणार्‍या नेमक्या कोणत्या बीएलओंना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवायचे ? याची माहिती संबंधित बीएलओंना  अचानक एक दिवस अगोदर देण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय यादी अंतिम करण्यात येत आहे. जवळपास 150 बीएलओंचे दप्‍तर तपासले जाणार आहे. या तपासणीत दोषी आढळणार्‍या बीएलओंवर लोकप्रतिनिधी अधिनियम,1950 चे कलम 32 नुसार तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांनी सांगितले.