Fri, Apr 26, 2019 03:40होमपेज › Ahamadnagar › श्रमदानाचे अमीर खानकडून कौतुक

श्रमदानाचे अमीर खानकडून कौतुक

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 19 2018 11:54PMकर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात श्रमदानातून उभारलेल्या तुफानाची अभिनेते अमीर खान यांनी दखल घेत टाळ्या वाजवून कौतुक केले. भारतीय जैन संघटनेचे आशिष बोरा यांनी कर्जतच्या टीमबरोबर श्रमदान करण्यासाठी अमीर खान यांना कर्जतला येण्याचे निमंत्रण दिले. त्यास त्यांनी प्रतिसाद दिला असून आता कर्जत तालुक्याला अमीर खान यांच्या भेटीची प्रतिक्षा आहे.

भारतीय जैन संघटनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांची बैठक धुळे येथे अभीनेते अमिरखान व त्याची पत्नी किरण राव यांनी घेतली. धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार व नाशिक या पाच जिल्ह्यातील पदाधिकार्‍याच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्हाध्यक्ष आदेश चंगेडीया यांनी स्वागत करताना जिल्ह्यातील कामाचा आढावा मांडला. तर प्रास्ताविक नंदू साकला यांनी केले. यानंतर आमीरखान यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधताना सत्यमेव जयतेपासून पाणी फाउंडेशनच्या निर्मितीचा प्रवास मांडला. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीभाऊ मुथ्था यांचे बरोबरचे अनुभव विशद केले.

शांतीभाऊ मुथ्था हे अत्यंत जलद निर्णय घेतात. माझा, सत्यजित भटकळ व शांतीभाऊ यांचा हेतू समान आहे. जैन  समाजाची जी तत्वे आहेत तिच या कामाची प्रेरणा आहेत, असे म्हणत इतरांना समजून घेण्याची व माफ करण्याची कार्यपद्धतीमुळे आपण प्रभावित आहोत, असे अमीरखान यांनी म्हटले. यानंतर भारतीय जैन संघटनेचे नंदुरबार व कर्जतचे आशिष बोरा यांना संधी मिळाली. बोरा यांनी गेले 35  दिवस सुरू असलेल्या श्रम चळवळीची माहिती दिली.

शासकीय अधिकार्‍यांसह रोटरी क्लब, स्त्री फाउंडेशन, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रतिष्ठान, विविध संघटना, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे सांगितले. ही माहिती ऐकताना अमीरखान वेळोवेळी दाद देत होते. टाळ्या वाजवत कौतुक केले. अमीरखान व किरण राव यांनी श्रमदानासाठी कर्जत तालुक्यात यावे, असे निमंत्रण बोरा यांनी दिले. या बैठकीस पाथर्डीचे विश्वजित गुगळे, घेवरचंद भंडारी, राजेंद्र पटवा, नगरचे अमित बोरा, संतोष कासवा आदी उपस्थित होते. मंचावर किरण राव, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक चोपडा, विजय दुग्गड आदी उपस्थित होते.