Sun, Mar 24, 2019 23:33
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › दुसर्‍या दिवशीही काम ठप्पच

दुसर्‍या दिवशीही काम ठप्पच

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMनगर : प्रतिनिधी

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी  कर्मचारी व शिक्षक तीन दिवसांच्या संपावर गेले असून, दुसर्‍या दिवशीही बुधवारी जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्पच होते. सर्वच कार्यालयांच्या  परिसरात शुकशुकाट पसरला असून, संपामुळे नागरिकही या कार्यालयांकडे फिरकले नाहीत.  

सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, थकित महागाई भत्ता मिळावा, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, पाच दिवसांचा आठवडा जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांनी तीन दिवसांच्या संपाची हाक दिली.  त्यानुसार जिल्हाभरातील जवळपास 42 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाच्या दुसर्‍या दिवशी देखील कर्मचारी व शिक्षक शंभर टक्के संपावर गेले असल्याने शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प होते. माध्यमिक व प्राथमिक शाळा देखील दुसर्‍या दिवशी ओस पडल्या होत्या. कर्मचारीच कामावर नसल्याने अधिकारी देखील कार्यालयांत निव्वळ बसून होते. 

जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांच्या नेतृत्वाखाली काल (दि.8)  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सुभाष तळेकर, पी,डी. कोळपकर, दिनकरराव घोडके, भाऊसाहेब डमाळे आदी पदाधिकार्‍यांसह  कर्मचारी व शिक्षक या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या वेळकाढूपणाचा आणि कामगार विरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला गेला.

आज (दि.9) संपाचा तिसरा दिवस असणार आहे. या दिवशी देखील कर्मचारी, शिक्षक संपात सहभागी होणार आहेत. या तीन दिवसीय संपाची दखल शासनाने न घेतल्यास सरकारी कर्मचारी ऑक्टोबर 2018  मध्ये बेमुदत संपावर जाणार असल्याचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांनी सांगितले. संपात सहभाग घेतल्याबदृल अद्यापि कोणालाही शासनाची नोटिस मिळाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.