Thu, Nov 15, 2018 11:41होमपेज › Ahamadnagar › अपघातात महिला ठार, दोघे गंभीर जखमी

अपघातात महिला ठार, दोघे गंभीर जखमी

Published On: Jan 19 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 10:42PMवाडेगव्हाण : वार्ताहर

नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील वेताळवस्ती लगत कार दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात काल (दि.18) सकाळी साडेआठ वाजता झाला.

याबाबत सुपा पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल सकाळी साडेआठ वाजता पुण्याहून नगरच्या दिशेने कार (क्र. एमएच-14 जीएच- 4821) भरधाव वेगाने येत होती. चालकाला रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने कार दुभाजकाला धडकून तिचा मागील टायर फुटला. त्यामुळे कार रस्त्याच्याकडे उलटली. या अपघातात नर्मदा पंढरीनाथ थोरवे (वय 43, रा. जगन्नाथपुरी रोड, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांच्या डोक्याला डाव्या बाजूस जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक निर्वाण पंढरीनाथ थोरवे (वय-21), पंढरीनाथ तात्याराव थोरवे (वय 47) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच राजेंद्र भानुदास शेळके यांच्यासह ग्रामस्थ अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी सुपा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.पुढील तपास सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. जे. पठाण, कडूस हे करत आहेत.