Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Ahamadnagar › महिला सरपंच, सदस्यांना प्रशिक्षण

महिला सरपंच, सदस्यांना प्रशिक्षण

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 11:04PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या महिला सरपंच व सदस्य यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय माहिती मागविली गेली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक हजार महिला सदस्य व 67 सरपंच यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यभरातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत 50 टक्के महिला सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.  यंदापासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाली आहे. सरपंचपदासाठी देखील महिलांना आरक्षण लागू आहे. 

शासनाचे महिला सक्षमीकरण धोरण लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य व सरपंच यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून महिला सदस्य व सरपंच यांची माहिती तात्काळ पाठविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास एक हजार सदस्यपदी महिला तर 67 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला निवडून आल्या आहेत.

या महिलांना सदस्यांना प्रशासकीय कामकाच व केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध योजनांची माहिती आदीबाबत राज्य महिला आयोगाच्या वतीने लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाकडे फिरविली जाते पाठ 

जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींच्या सदस्यांना शासनाच्या वतीने पुणे येथील यशदामध्ये प्रशिक्षण आयोजित केले जाते. परंतु बहुतांश वेळा या प्रशिक्षणाला म्हणावा, असा प्रतिसाद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मिळत नाही.राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतलेल्या या प्रशिक्षणाला ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांकडून किती प्रतिसाद मिळेल याची उत्सुकता ताणली गेली आहे.