Tue, Apr 23, 2019 08:00होमपेज › Ahamadnagar › महिलेचा कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

महिलेचा कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:54PMनगर : प्रतिनिधी

शनिशिंगणापूर येथील गणेश मच्छिंद्र भुतकर यांची हत्या करणारे काही आरोपी मोकाट फिरत आहेत. या आरोपींना अटक करण्यास पोलिस प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याच्या निषेधार्थ त्यांची पत्नी अनिता भुतकर यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. 

अनिता भुतकर यांचे पती गणेश भुतकर यांची 20 डिसेंबर 2017 रोजी हत्या करण्यात आली. या हत्येतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु मुख्य आरोपी अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे दोन आरोपी अद्यपि फरार आहेत. या दोन आरोपींना अटक करण्यास पोलिस टाळाटाळ करत आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात विचारणा केली असतात, उडवाउडवीचे उत्तरे पोलिसांकडून मिळत आहेत. आरोपी बानकर हा दिवसाढवळ्या नगरमध्ये फिरत आहे. याबाबात पोलिसांना माहिती दिली तरी पोलिस कोणतीच कार्यवाही करत नाही. या दोन आरोपींना अटक करा, अन्यथा दोन मुलींसह अंगावर रॉकेल ओतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल, असा इशारा अनिता भुतकर यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता.  

जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही अद्यपि आरोपींना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ काल (दि.6) अनिता भुतकर यांच्यासह रामेश्वर भुतकर, सुभद्राबाई भुतकर,  केसरबाई भुतकर, द्वारकाबाई भुतकर आदींनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या दोन आरोपींकडून संपूर्ण कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी अनिता भुतकर यांनी पोलिसांनाकडे यावेळी केली. पोलिसांनी संरक्षण देण्याचे आश्‍वासन भुतकर कुटुंबाला दिले आहे.