Tue, Apr 23, 2019 01:46होमपेज › Ahamadnagar › शासकीय गोदामाविना तूर खरेदी रखडली!

शासकीय गोदामाविना तूर खरेदी रखडली!

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 23 2018 11:20PMशेवगाव : रमेश चौधरी

शासकीय गोदामाअभावी जवळपास 70 टन तूर व 15 टन हरभरा पिक वाहनातच अडकून पडले आहे. तर काही खरेदी झालेले उत्पन्न केंद्रावर पडून आहे. दरम्यान, तूरखरेदीला मुदतवाढ दिली असली तरी गोदामाअभावी ही खरेदी करणे अशक्य झाले आहे. 

शेवगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 17 फेब्रुवारीपासून 5 हजार 450 रुपये हमीभावाने शासकीय तूर खरेदी सुरू आहे. येथे 1 हजार 776 शेतकर्‍यांची 16 हजार 456 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शासनाने 18 एप्रिल रोजी ही खरेदी बंद केल्याने नोंदणी झालेल्या 1 हजार 100 शेतकर्‍यांची तूर खरेदी करणे शिल्लक राहिले आहे. या खरेदीस मुदतवाढ देण्यात आली असली तरी अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत.

तुरीपाठोपाठ 20 एप्रिलपासून या आवारात हरभर्‍याची 4 हजार 400 रुपये या हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. नोंदणी केलेल्या 2 हजार 250 शेतकर्‍यांपैकी आत्तापर्यंत 556 क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. दररोज ही खरेदी 500 क्विंटल होऊ शकते परंतु शासकीय गोदामाच्या अडचणीने हरभरा खरेदी संथ गतीने चालू आहे.

शासकीय खरेदी केलेले तुरीचे काही उत्पन्न  शासनाच्या पुणतांबा व नागापूर येथील गोदामात जमा झाले आहे. पंरतु गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय गोदाम उपलब्ध नसल्याने 120 टन तुरी येथील खरेदी केंद्रावर पडून आहेत. तर त्यातील 70 टन तुरीच्या 3 ट्रक व 15 टन हरभर्‍याची 1 ट्रक गोदामाअभावी गेल्या 12 दिवसांपासून वाहनात अडकून पडल्या आहेत. खरेदी केंद्रात खरेदी केलेला हा माल जोपर्यर्ंत शासकीय गोदामात जात नाही तोपर्यंत त्याच्या रक्कमेची पुढील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांची रक्कम मिळण्यास अवधी होत चालला आहे. त्यामुळे शासनाने वाहनाची व गोदामाची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेमार्फत ही खरेदी चालू आहे. खरेदी झालेले हे उत्पन्न शासकीय गोदामात जाईपर्यंत या संस्थेची जबाबदारी आहे. येथे मोजमाप झालेल्या उत्पन्नाचे पुन्हा पुढील गोदामात मोजमाप होते परंतु शासनाच्या हलगर्जीपणानेे खरेदी केंद्रावर अडकून पडलेल्या उत्पन्नाचे मोठे नुकसान होते. हा भुर्दंड संस्थेला सहन करावा लागतो तर वाहतुकीबाबत कुठलेही स्पष्ट आदेश नसल्याने वाहनभाड्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

दरम्यान, तूरखरेदीला मुदतवाढ दिली असली तरी गोदामाअभावी ही खरेदी करणे अशक्य झाले आहे. उलट या कारणाने हरभरा खरेदीच बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने गोदाम उपलब्ध करून द्यावेत तसेच वाहनाची शासकीय व्यवस्था करावी आणि अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना आपल्या उत्पन्नाचे दाम तातडीने द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उत्पादक शेतकर्‍यांनी दिला आहे.

जशी जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे देऊ

जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातील दक्षिणेत असणार्‍या खरेदी संस्था मिरज(जि.सांगली) येथील शासकीय गोदामात हा माल घेऊन जात आहेत. शेवगावसाठी जवळील गोदामात जशी किरकोळ जागा उपलब्ध होईल तशी देऊ असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत भूषण पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

वाहतूक भाड्यामुळे संस्था अडचणीत

शेवगाव येथील जगदंबा महिला संस्थेशी संपर्क केला असता मिरज येथील गोदाम दक्षिणेतील इतर संस्थेला जवळ आहे तर शेवगावपासून हे अंतर वाहतुकीला जास्त आहे. त्याप्रमाणे वाहतूक भाडे संबंधी स्पष्टीकरण नाही. त्यामुळे शासनाने वाहतूक करावी. संस्था अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.