Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › दोन मुलींसह विवाहितेची आत्महत्या

दोन मुलींसह विवाहितेची आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वांबोरी : वार्ताहर

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील विवाहितेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. 
सुवर्णा प्रशांत कल्हापुरे (वय 30), अक्षदा प्रशांत कल्हापुरे (वय 9) व आराध्या प्रशांत कल्हापुरे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत.  

खडांबे खुर्द येथील प्रशांत कलापुरे हे कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका खासगी बँकेत कर्मचारी आहेत. त्यांचे सासरे आजारी असल्याने राहुरी येथे एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी प्रशांत कल्हापुरे पत्नीसह शुक्रवारी सायंकाळी खडांबे येथे आपल्या घरी मुक्कामी आले. शनिवारी सकाळी ते सासर्‍यांना भेटायला जाण्यासाठी निघाले असता, पत्नी सुवर्णा हिने शेजारील डाळिंबाच्या बागेतून डाळिंब आणते, असे म्हणून आपल्या मुलींसह डाळिंब आणण्यासाठी ती गेली.

बराच वेळ त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे  पती प्रशांत यांनी शोधाशोध केली असता सुवर्णाचे स्वेटर विहिरीच्या काठावर व चपला विहिरीच्या पाण्यावर तरंगतांना दिसल्या. त्यांनी आपला धाकटा भाऊ विजय कल्हापुरे याला बोलावून घेऊन पाहण्यासाठी सांगितले. त्यांनी तात्काळ विहिरीत उडी घेऊन आराध्या हिस बाहेर काढले. परंतु तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर गावातील इतर लोकांना बोलून सुवर्णा व अक्षदा याचा शोध घेतला. अक्षदाचा मृतदेह सापडला. मात्र, सुवर्णाचा शोध लागत नव्हता. त्यानंतर राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुवर्णाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राहुरी येथे पाठविण्यात आलेे.

काल सायंकाळी या तिघी माय- लेकींवर खडांबे खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वांबोरी दूरक्षेत्र हद्दीत एकाच कुटुंबातील तीनजण विहिरीत पडून मयत झाल्यानंतरही वांबोरी पोलिस घटना घडल्यानंतर चार तासांनंतर घटनास्थळी दाखल झाले. 

दरम्यान, याबाबत प्रशांत कल्हापुरे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, माझी पत्नी व मुली विहिरीत डोकावण्यासाठी गेल्यामुळे  घसरून पडल्या असाव्यात. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.